दोन महिला नक्षलींचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण

0
30

गडचिरोली-: सुमारे चार लाखांचे बक्षीस असलेल्या दोन महिला नक्षलींनी नुकतेच गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आहे. माली उर्फ वनिता झगडू वड्डे(२५) रा.झुरी व मीना उर्फ सगणी मादी नरोटे(२५) रा.झारेवाडा ता.एटापल्ली अशी आत्मसमर्पित नक्षलींची नावे आहेत.
माली उर्फ वनिता वड्डे ही कंपनी क्रमांक १० ची सदस्य होती. एप्रिल २००६ मध्ये ती कसनसूर एरिया मिलिशिया दलममध्ये भरती झाली. त्यानंतर प्लाटून क्रमांक १५, कंपनी क्रमांक ४ मध्येही तिने कार्य केले. अशातच कंपनी क्रमांक १० ची स्थापना झाल्यानंतर नोव्हेंबर २०११ पर्यंत या कंपनीत कार्यरत होती. २००६ मध्ये कसनसूर उपपोलिस ठाण्यावर झालेला हल्ला, झुरी नाल्यावरील चकमक, २००९ मधील मरकेगाव, मुंगनेर, हत्तीगोटा व भिमनखोजी येथील अॅम्बूश व चकमक, २०१० मधील मल्लमपोडूर येथील अॅम्बूश व चकमक, २०११ मधील हलवेर-कियर येथील जीपची जाळपोळ तसेच छत्तीसगडमधील ९ नंबर या गावी काळा झेंडा फडकविणे इत्यादी गुन्ह्यांमध्ये तिचा सहभाग होता.
मीना उर्फ सगणी मादी नरोटे ही कंपनी क्रमांक १० ची सदस्य होती. मे २०११ मध्ये ती गट्टा दलममध्ये भरती झाली. २०११ मधील डोकेनटोला चकमक व इरकडुम्मे येथील जाळपोळीत तिचा सहभाग होता. दोघींवर प्रत्येकी दोन लाख रुपयांचे बक्षीस होते. अवघ्या पावणेदोन वर्षात सुमारे शंभर नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले असून, नक्षल चळवळीला जबर धक्का बसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.