जिल्हाधिकारी रणजितकुमार,सीईओ संपदा मेहताचे स्थानांतरण

0
23

गडचिरोली-: येथील जिल्हाधिकारी श्री.रणजितकुमार व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी संपदा मेहता यांचे स्थानांतरण करण्यात आले असून, रणजितकुमार हे सोलापूरचे, तर संपदा मेहता ह्या अहमदनगरच्या नव्या जिल्हाधिकारी असतील.श्री.रणजितकुमार यांच्या जागेवर पालघरचे जिल्हाधिकारी अभिजित बांगर, तर संपदा मेहता यांच्या जागेवर राजुऱ्याचे उपविभागीय अधिकारी शंतनू गोयल गडचिरोलीला येणार आहेत.

रणजितकुमार हे १० सप्टेंबर २०१३ रोजी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले. मृदूभाषी म्हणून ओळख असलेल्या रणजितकुमार यांनी आपल्या अडीच वर्षांच्या कारकिर्दीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. कौशल्य विकास कार्यक्रम राबवून जिल्ह्यातील आदिवासी युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल ‘लोकप्रशासनात उत्कृष्ठ कार्य केल्याबद्दल अखिल भारतीय सेवेतील अधिकारीपदासाठीचा पंतप्रधान पुरस्कार’ देऊन श्री.रणजितकुमार यांना २१ एप्रिल २०१५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले होते.

संपदा मेहता ह्या १० फेब्रुवारी २०१४ रोजी गडचिरोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी म्हणून रुजू झाल्या. अत्यंत साधी राहणी व कमालीच्या शिस्तप्रिय अशी संपदा मेहता यांची ओळख होती. मेहता यांनी आपल्या दोन वर्षांच्या कार्यकाळात जिल्हा परिषदेतील गैरप्रकारांना आळा घालून अनेक चांगले उपक्रम राबविले.