बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि ‘जननायक’ कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न जाहीर

0
9

बिहारचे माजी दिवंगत मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर (Karpoori Thakur) यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जाहीर केलेल्या निवेदनात ही घोषणा करण्यात आली आहे. दीर्घ काळापासून कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न दिला जावा अशी मागणी होत होती. जी आता पूर्ण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निर्णयाबाबत आनंद व्यक्त केला आहे. बिहारचे जननायक अशी त्यांची ओळख होती. कर्पूरी ठाकूर यांचा जन्म १९२४ मध्ये झाला होता. बिहार राज्याचे ते पहिले बिगर काँग्रेसी मुख्यमंत्री होते. कर्पूरी ठाकूर हे बिहारचे दोनदा मुख्यमंत्री आणि एकदा उपमुख्यमंत्री होते.

१९५२ मध्ये पहिल्यांदा आमदार

बिहार विधानसभेत १९५२ मध्ये कर्पूरी ठाकूर हे पहिल्यांदा आमदार झाले होते. त्यानंतर ते कधीही आमदारकीची निवडणूक हरले नाहीत. १९६७ मध्ये देशातल्या नऊ राज्यांमध्ये बिगर काँग्रेसची सरकारं आली. त्यावेळी बिहारच्या महामाया सरकारमध्ये कर्पूरी ठाकूर हे शिक्षण मंत्री आणि उपमुख्यमंत्री होते. १९७७ मध्ये ते पहिल्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. कर्पूरी ठाकूर यांनी समाजातील भेदभाव आणि असमानता यांच्या विरोधात आयुष्यभरासाठी संघर्ष केला.