पोलिस मुख्यालयातून एके-४७ सह १२० काडतुसे लंपास

0
11

गडचिरोली, दि.१०: येथील पोलिस मुख्यालयातून एके ४७ रायफलीसह तब्बल १२० काडतुसे गायब झाल्याने खळबळ माजली आहे. नक्षलग्रस्त जिल्ह्यात काडतुसे आणि रायफली गायब होण्याची ही गेल्या तीन वर्षातील दुसरी घटना असल्याने पोलिसांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

काल गुरुवारी पोलिस मुख्यालयातील स्पेशल अॅक्शन ग्रूपमधील पोलिस कर्मचारी श्री.हलामी यांच्याद्वारे एके ४७ रायफल व तब्बल १२० काडतुसे लंपास झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिस अधीक्षकांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. रायफली गायब होण्याची ही दुसरी वेळ आहे. २०१३ मध्ये नक्षल्यांना साहित्य पुरवण्याच्या आरोपाखाली एका काँग्रेस नेत्याला पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर पोलिस मुख्यालयाच्या शस्त्रागारातून काही बंदुका व काडतुसे गायब असल्याचे निदर्शनास आले होते.