सारंग अकोलकरनेच डॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडल्या!

0
6

पुणे- सनातनचा साधक आणि गोवा बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सारंग अकोलकर यानेच डॉ. नरेंद्र दाभोलकरांवर गोळ्या झाडल्या. तर सध्या अटकेत असलेला डॉ. वीरेंद्रसिंग तावडे हा नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचा दावा केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) केला आहे.

सनातनचा साधक असलेल्या विरेंद्र तावडे याला सीबीआयने शुक्रवारी अटक केली होती. तेव्हापासून सुरू असलेल्या तपासात नवनवीन माहिती समोर येत आहे. या माहितीच्या आधारे डॉ. दाभोलकरांच्या हत्या प्रकरणात सनातनचा हात असल्याचा संशय अजून बळावत आहे.

डॉ. दाभोलकरांच्या हत्येनंतर रेखाटण्यात आलेले मारेक-याचे रेखाचित्र सनातनचा साधक असलेल्या सारंग अकोलकरशी मिळते-जुळते असल्याचेही सीबीआयने म्हटले आहे. या संदर्भातले पुरावे गोळा करण्याचे कामही सीबीआयने सुरू केले आहे. सीबीआयने सनातनच्या पनवेल आश्रमातून हार्ड डिस्क जप्त केली असून, त्यातून आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.सध्या सीबीआयच्या कोठडीत असलेल्या विरेंद्रसिंह तावडे याचा डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी सहभाग असल्याचे परिस्थितीजन्य पुरावे उभारण्यावर सीबीआयने भर दिला आहे.

कारण याअगोदर अशा प्रकारच्या अनेक प्रकरणांत सबळ पुराव्यांच्या अभावाचा फायदा आरोपीला मिळाल्याची अनेक उदाहरणे समोर आली असल्याने या प्रकरणी सुरुवातीपासूनच हा प्रयत्न असल्याचे सीबीआयच्या एका अधिका-याने सांगितले.