दाभोलकर हत्येत पोलिसाचा सहभाग ?

0
10

पुणे- अंनिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या कटात पुणे पोलिस दलात कार्यरत असलेला एक अधिकारी सहभागी असल्याचा निष्कर्ष तपासादरम्यान धक्कादायकरित्या समोर येत आहे. सीबीआयच्या अटकेत असलेला वीरेंद्र तावडेला या पोलिस अधिक-यानेच नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येसाठी शस्त्र पुरविल्याचे तपासात पुढे येत आहे.
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी सीबीआयने सनातनचा साधक डॉ. वीरेंद्र तावडे याच्याविरुद्ध चौकशीचा फास आवळल्यानंतर या प्रकरणी नवीन माहिती तपास पथकाच्या हाती येत आहे. त्यानुसार, डॉ. दाभोलकर यांच्या हत्येपूर्वी तीन महिने तावडे यास एका अज्ञात व्यक्तीने ईमेल पाठवून डॉ. दाभोलकर यांच्यावर लक्ष्य केंद्रित करण्यास सांगितले होते. त्याआधी 2009 मध्ये दाभोलकरांच्या हत्येचा कट शिजला होता. परंतु गोव्यातील बॉम्बस्फोट प्रकरणामुळे हा हत्येचा कट चार वर्षे लांबला. वीरेंद्र तावडे आणि सारंग अकोलकर यांना पुणे पोलिस दलातील संबंधित अधिका-यानेच शस्त्र पुरविल्याचे पुढे येत आहे. सीबीआयकडून संबंधित अधिकारी आणि तावडे यांच्यात झालेले कॉल रेकॉर्डस तपासले जात आहेत. तसेच सीबीआय त्याच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. त्याबरोबरच पुढील तपासात आणखी खळबळजनक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.