जिल्ह्यातील इंटरनेटची साक्षरता वाढवावी- जिल्हाधिकारी सूर्यवंशी

0
13

इंटरनेट साथी प्रशिक्षण
गोंदिया,दि.१७ : सद्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे. त्यामुळे इंटरनेटचा वापर कसा करावा याबाबत प्रत्येकाला माहिती असणे आवश्यक आहे. आता गुगल सर्च केले की, हवामानाचा अंदाज, जन्माचा दाखला, शेतीविषयक सात-बारा उतारा आदींची माहिती एका क्लिकवर इंटरनेटद्वारे उपलब्ध होते. त्यामुळे जास्तीत जास्त इंटरनेट साथी बघिनींनी इंटरनेटचे प्रशिक्षण घेऊन जिल्ह्यातील इंटरनेटची साक्षरता वाढवावी. असे मत जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.आज (ता.१७) ग्रीन लॅन्ड लॉन गोंदिया येथे टाटा ट्रस्ट आणि गुगल इंडिया व माहिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त वतीने डिजीटल साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत ‘इंटरनेट साथी प्रशिक्षणङ्क कार्यक्रमाचे उदघाटन केल्यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करतांना डॉ.सूर्यवंशी बोलत होते. यावेळी माविम मुंबईचे उपव्यवस्थापक महेश कोकरे, दिल्ली येथील टाटा ट्रस्टचे इंटरनेट प्रशिक्षक श्री.नविनकुमार यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी पुढे म्हणाले, सध्या जिल्ह्यातील ४२२ गावांमध्ये महिला आर्थिक विकास महामंडळ काम करीत आहे. हा एक नाविन्यपूर्ण क्रांतीकारी उपक्रम आहे. जास्तीत जास्त महिलांनी इंटरनेट साथी उपक्रमाअंतर्गत इंटरनेटचे प्रशिक्षण घेवून आपण आपल्या गावामध्ये इंटरनेटच्या वापराबाबत योग्य ती माहिती देवून जनजागृती करावी. त्यामुळे जिल्ह्यातील इंटरनेटची साक्षरता वाढण्यास निश्चितच मदत होणार आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
श्री.कोकरे म्हणाले, आजकाल नोकरीसाठी वा कोणत्याही क्षेत्रात ऑनलाईन अर्ज भरण्याची पध्दत आहे. त्यामुळे महिलांनी सक्षम होण्यासाठी इंटरनेटचा वापर केला पाहिजे. जगाबरोबर वावरायचे असेल तर इंटरनेटचे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे असेही त्यांनी सांगितले. श्री.नविनकुमार यांनी इंटरनेटच्या वापराबाबत सविस्तर माहिती विशद केली.
प्रास्ताविक माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनिल सोसे यांनी केले. त्यांनी प्रास्ताविकातून सांगितले की, टाटा ट्रस्ट आणि गुगल इंडिया व माहिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या वतीने इंटरनेट साथी या नाविन्यपूर्ण उपक्रमाद्वारे ग्रामीण क्षेत्रात महिलांसाठी इंटरनेट संदर्भात जाणीव जागृती निर्माण करणे तसेच डिजिटल साक्षरतेच्या माध्यमातून सामाजिक सुरक्षेच्या योजना, मार्केट दर, शेती विषयक पध्दती आदी बाबतची माहिती होण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात ३६ इंटरनेट साथीच्या माध्यमातून १६५ गावांमध्ये बचत गटातील महिलांना माहिती देण्याचा उपक्रम सुरु करण्यात येत आहे असे सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांच्या हस्ते उपस्थित इंटरनेट साथी बघिनींना एन्ड्रॉईड मोबाईल आणि टॅब वितरीत करण्यात आले.
प्रारंभी जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांनी दीप प्रज्वलीत करुन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन इंटरनेट साथी प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन केले. कार्यक्रमास महिला आर्थिक विकास महामंडळ कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व इंटरनेट साथी बघिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या. संचालन योगिता राऊत यांनी केले, तर उपस्थितांचे आभार सतीश मार्कंड यांनी मानले.