कोपर्डी प्रकरणातील संशयितांवरील खटला जलदगती न्यायालयात चालवणार- मुख्यमंत्री

0
6

पीडित मुलीच्या कुटुंबियांना सरकारकडून सर्वतोपरी मदत

मुंबई, दि 18 : अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे अल्पवयीन मुलीवर झालेली अत्याचाराची घटना अत्यंत दुर्दैवी असून या प्रकरणात तातडीने न्याय मिळावा आणि अशा प्रकारच्या घटनांना जरब बसावी यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले.
विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे- पाटील,पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार, दिलीप वळसे पाटील यांनी या प्रकरणाबाबत विधानसभेत स्थगन प्रस्ताव मांडला होता. मुख्यमंत्र्यांनी या
घटनेसंदर्भातील शासनाच्या भूमिकेबाबत यावेळी निवेदन केले. मुख्यमंत्री म्हणाले, राज्य शासन पीडित मुलीच्या कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून त्यांना मुख्यमंत्री सहायता कक्षामार्फत पाच लाख आणि मनोधैर्य योजनेतून तीन लाख रुपयांची मदत करण्यात येत आहे. तसेच त्यांना पोलीस संरक्षणही देण्यात आले आहे.कोपर्डीत अत्याचाराची घटना घडल्यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर कायद्यातील कठोरात कठोर कलमांद्वारे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. या प्रकरणातील संशयित जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितिन भैलुमे सध्या पोलीस कोठडीमध्ये असून या प्रकरणी दोषी गुन्हेगारांना तातडीने कडक शिक्षा मिळावी यासाठी शासनामार्फत हा खटला जलदगती न्यायालयात (फास्ट ट्रॅक कोर्ट) चालविला जाणार आहे. तसेच ॲड. उज्ज्वल निकम यांची या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्यात आली असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
अत्याचाराच्या घटनेनंतर तातडीने करण्यात आलेल्या कार्यवाहीविषयी श्री. फडणवीस म्हणाले, न्यायवैद्यक पथकाला घटनास्थळी तात्काळ पाचारण करण्यात आले होते. तसेच आरोपींची वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदनाचे नमुने तपासणीसाठी कलिना येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविले आहेत. या भागात पोलिसांची गस्त वाढविण्यात आली असून हे प्रकरण अहमदनगरचे अपर पोलीस अधीक्षक या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे वर्ग करण्यात आले आहे.