जयची शिकार? संशयीताची कसून चौकशी

0
11

गोंदिया,(berartimes.com)दि.17 : आशियातील सर्वात मोठा वाघ म्हणून ओळख झालेल्या नागझिरा,उमरेड कर्हांडला व्याघ्रप्रकल्पाचा हिरो ठरलेल्या जय वाघाची शिकार झाली आहे का या दृष्टीने वनविभागाच्या नागपूर एसआयटीने तपास सुरु केल्याची माहिती समोर येत आहे. एसआयटी आणि सीबीआयच्या पथकाने मंगळवारला सायकांळी दोन संशयीत शिकाऱ्यांना अटक केली आहे. किसन इस्त्री समर्थ आणि मधुकर हतवार अशी या शिकाऱ्यांची नावे असून त्यांच्याकडून काही साहित्य ही हस्तगत केले आहे.हे शिकारी रानडुकरासह इतर प्राण्याची इलेक्ट्रिक कंरट लाऊन शिकार करीत असल्याची चर्चा पवनी तालुक्यात असून या भागातील वनविभागाच्या बहुतांश अधिकारी व कर्मचारी यांना यांच्याबाबत माहिती असल्याचेही बोलले जात आहे.
पवनी तालुक्यातील कोडुर्ली गावातून या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून नायलॉनची दोरी आणि 1-18 आकाराची इलेक्ट्रिक वायर जप्त करण्यात आली आहे. वाघाची किंवा इतर प्राण्यांची शिकार करण्यासाठी हे साहित्य वापरले जाते. त्यांच्याकडे जय संदर्भात चौकशी सुरु असून त्यांनी काय माहिती दिली हे अद्याप कळू शकलेले नाही.उमरेड कर्हांडला मधून जय वाघ हा 18 एप्रिलपासून बेपत्ता झाला होता.त्याच्या शोधासाठी 100 हून अधिक पथके तयार करण्यात आली होती.तब्बल 250 किलो वजन असलेल्या या वाघाची एक झलक पाहण्यासाठी उमरेडला पर्यटक भेट द्यायचे. मात्र अचानक हा वाघ गायब झाल्याने वन्यप्रेमींची निराशा झाली आहे.

जय ची शिकार कंरटने तर झाली नसावी ना याबाबत पवनी तालुक्यातील बहुतांश भागात चर्चा आहे.आरोपींनी रानडुकर किंवा इतर प्राण्याला मारण्यासाठी वायर लावून ठेवला असावा त्यात चुकीने जय ला करंट लागून जय चा मृत्यु तर झाला नसावा अशी शंका वर्तविली जात आहे.यासाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विशेष एक चौकशी पथक नेमण्याची गरजही व्यक्त केली जात आहे.जय च्या बाबतीत वनविभाग व वन्यजीव विभाग सुध्दा गाफील राहिल्याने दुसर्या यत्रणेमार्फत चौकशी सुरु ठेवल्यास काही तरी सत्य समोर येईल अशी भावन लोकांच्या मनात दिसून येत आहे.