जिल्हा नियोजन समिती; जिल्हा वार्षिक योजनेसाठी २३२ कोटी ३३ लक्ष

0
9

गोंदिया,दि.१७ : जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून विकास कामे करण्यात येतात. लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देतांना योग्य व गरजु लाभार्थ्यांची निवड करुन विकास कामे दर्जेदार करतांना ती निर्धारित वेळेत पूर्ण करा. असे निर्देश पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात १६ ऑगस्ट रोजी जिल्हा नियोजन समितीच्या सभेत अध्यक्षस्थानावरुन पालकमंत्री बडोले बोलत होते. जि.प.अध्यक्ष उषा मेंढे, आमदार सर्वश्री गोपालदास अग्रवाल, विजय रहांगडाले, संजय पुराम, जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भुजबळ, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत पाडवी, जिल्हा नियोजन अधिकारी तेजबहाद्दूर तिडके यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री पुढे म्हणाले, ग्रामीण भागातील जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा मिळण्यासाठी वैद्यकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरावी. ज्या आरोग्य उपकेंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारती नादुरुस्त आहे त्या तातडीने दुरुस्त कराव्यात. जेथे उपकेंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर आहे तेथील जमीन अधिग्रहीत करुन इमारतीचे बांधकामे तातडीने पूर्ण करावे. जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागाच्या दवाखान्याची अवस्था वाईट असून हे चित्र बदलण्यासाठी मंत्रालयात या विभागाचे मंत्री व जिल्ह्यातील आमदार यांची लवकरच बैठक बोलावणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील माजी मालगुजारी तलावातील पाण्याचा वापर शेती व मत्स्योत्पादनासाठी व्हावा यासाठी या तलावांच्या दुरुस्तीची कामे पाटबंधारे विभागाने नियोजनातून करावे असे सांगून श्री.बडोले म्हणाले, त्यामुळे शेतीची उत्पादकता वाढण्यासोबतच मासेमारी संस्थांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल. जिल्ह्यात दुधाचे संकलन वाढण्यासाठी दुग्ध व्यवसाय विभागाने पुढाकार घ्यावा असेही त्यांनी यावेळी सांगितले.
ते पुढे म्हणाले, जिल्ह्यातील ज्या शाळांच्या इमारती जीर्ण झालेल्या आहेत त्या इमारतींचे सर्वेक्षण करुन नव्याने इमारती बांधण्याचे नियोजन करावे. जिल्ह्यातील बंगाली शाळेतील शिक्षकांचे प्रश्न लवकरच सोडविण्यात येतील. जिल्ह्यात काही भागात धानावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे कृषी विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
आमदार संजय पुराम यांनी देवरी व सालेकसा तालुक्यात शिक्षकांची अनेक पदे रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे तरी शिक्षकांची रिक्त पदे तातडीने भरावी अशी मागणी यावेळी केली. गोंदिया शहरात माकडांचा, मोकाट जनावरांचा व डुकरांचा मोठ्या प्रमाणात नागरिकांना त्रास होत असल्यामुळे नगरपालिकेने त्वरित यावर उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा आमदार गोपालदास अग्रवाल यांनी व्यक्त केली.
आमदार विजय रहांगडाले यांनी जिल्ह्यातील शेतीचे माकडांमुळे व रानडुकरांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्यामुळे त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी वनविभागाने त्वरित कार्यवाही करावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
प्रास्ताविकातून जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी सांगितले की, सन २०१५-१६ या वर्षात जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सर्वसाधारण योजना/अनुसूचित जाती उपयोजना/आदिवासी उपयोजना यावर २२१ कोटी ८ लक्ष रुपये निधी खर्च झाला आहे. जिल्ह्यातील ११ पर्यटनस्थळांच्या विकासासाठी ४८ कोटी ४४ लक्ष रुपयांचा पर्यटन विकास कामांचा प्राधान्य आराखडा प्रस्ताव मंजूरी व निधी उपलब्धतेसाठी सादर केल्याचे त्यांनी सांगितले. सन २०१६-१७ या वर्षात जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत २३२ कोटी ३३ लक्ष रुपये नियतव्यय मंजूर करण्यात आला आहे. सन २०१६-१७ च्या जिल्हा पर्यटन विकासासाठी ३ कोटी ३० लक्ष रुपये निधी मंजूर असून या निधीचा उपयोग जिल्ह्यातील क वर्ग पर्यटन स्थळांच्या विकासासाठी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांनी दिली.
सन २०१६-१७ मधून शासनाने ८६.५७ कोटीच्या आर्थिक मर्यादेत सर्वसाधारण योजना तयार करण्याचे निर्देश दिले होते. पालकमंत्री यांच्या प्रयत्नाने या योजनेच्या नियतव्ययात वाढ करुन ती ११८ कोटी ३८ लक्ष इतकी करण्यात आली. सन २०१६-१७ मध्ये सर्वसाधारण योजनेत ११८ कोटी ३८ लक्ष, अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत ३८ कोटी ६५ लक्ष व आदिवासी उपयोजनेकरीता ७५ कोटी ३० लक्ष, असा एकूण २३२ कोटी ३३ लक्ष नियतव्यय मंजूर आहे.
सभेला समितीचे सदस्य श्रीमती शिला इटनकर, ओमप्रकाश येरपुडे, आशा पाटील, उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावर, वन्यजीव विभागाचे क्षेत्र संचालक रविकिरण गोवेकर, अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे, आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी जितेंद्र चौधरी, समाजकल्याणचे सहायक आयुक्त मंगेश वानखेडे यांचेसह विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते. उपस्थितांचे आभार जिल्हा नियोजन अधिकारी तेजबहादूर तिडके यांनी मानले.