सामाजिक न्याय मंत्र्यांच्या आश्वासनानंतर कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन मागे

0
13

मुंबई, दि. 17 : सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी
दिलेल्या आश्वासनानंतर विविध मागण्यांसाठी सामाजिक न्याय विभागातील
कर्मचारी व अधिकाऱ्यांनी पुकारलेले लेखणी बंद आंदोलन आज मागे घेतले.
            सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील अधिकारी व कर्मचारी
यांनी 12 सप्टेंबर 2016 पासून विविध प्रलंबित मागण्यांबाबत लेखणी बंद
आंदोलन सुरू केले होते. यासंदर्भात विविध कर्मचारी संघटनांनी बरोबर आज
सामाजिक न्याय व विशेष सहाय मंत्री श्री. बडोले यांच्या अध्यक्षतेखाली
बैठक झाली. त्यावेळी श्री. बडोले यांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत
सकारात्मक विचार करणार असल्याचे आश्वासन दिले. त्यानंतर संघटनांनी आंदोलन
मागे घेत असल्याचे श्री. बडोले यांना सांगितले.
            या बैठकीस सामाजिक न्याय विभागाचे सचिव डॉ. सुरेंद्रकुमार
बागडे, बार्टीचे महासंचालक राजेश ढाबरे,  समाज कल्याण विभागाचे उपायुक्त
एल. बी. महाजन, राजपत्रित संघटनेचे अध्यक्ष माधव झोड, महासचिव नितीन ढगे,
कार्याध्यक्ष राजेश वाघ, समाज कल्याण कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शांताराम
शिंदे, सचिव सुजित भांबुरे,  बार्टीचे प्राध्यापक बी. टी. मुळे यांच्यासह
राजपत्रित अधिकारी व कर्मचारी संघटनेचे सदस्य तसेच समाज कल्याण कर्मचारी
संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
            श्री. बडोले म्हणाले की, शिष्यवृत्ती घोटाळ्याच्या विशेष
चौकशी पथकाच्या चौकशीसंदर्भात  मुख्यमंत्री महोदयांसोबत चर्चा झाली असून
त्यांनी सकारात्मक आश्वासन देऊन मुख्य सचिवांना निर्देश दिले आहेत. तसेच
कर्मचारी व अधिकारी संघटनेच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात प्राधान्याने
विचार करण्यात येईल. कर्मचारी भरतीमध्ये झालेल्या गैरप्रकाराच्या
चौकशीसंदर्भात योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. तसेच जिल्हा जात पडताळणी
समितीसाठी पदांच्या निर्मितीसाठी सुधारित आकृतीबंध तयार करण्यात येऊन
आवश्यक ती पदे मंजूर करण्यात येतील. तालुकास्तरावरील समाज कल्याण
अधिकाऱ्यांबाबत सामान्य प्रशासन विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे,
असेही श्री. बडोले यांनी यावेळी सांगितले
कर्मचारी व अधिकारी संघटनेच्या इतर मागण्यासंदर्भात सकारात्मक विचार
करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
            सामाजिक न्याय मंत्री श्री. बडोले यांनी दिलेल्या
आश्वासनानंतर अधिकारी व कर्मचारी संघटनेचे समाधान झाले असून लेखणी बंद
आंदोलन मागे घेण्यात येत आहे, असे राजपत्रित संघटनेचे अध्यक्ष माधव झोड
यांनी यावेळी जाहीर केले.