शाळेत तंबाखूजन्य पदार्थ खाऊन जाणारे शिक्षक निलंबित होणार

0
9

berartimes.com,गोंदिया,दि.१६ – शाळेत तंबाखूजन्य पदार्थ खाऊन व दारु पिऊन जाणाऱ्या शिक्षकांना ताबडतोब निलंबित करावे, त्यांची बढती व पुरस्कार काढून घ्यावेत, असे आदेश शिक्षण संचालकांनी दिल्याने शिक्षकांमध्ये खळबळ माजली आहे.

पुणे येथील शिक्षण संचालनालयातील उपसंचालक(प्राथमिक) शरद गोसावी यांनी १४ सप्टेंबर २०१६ रोजी सर्व शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकाऱ्यांना एक पत्र पाठविले आहे. राज्यातील सर्व शाळांमधील शिक्षकांना तंबाखू, खर्रा, सिगारेट व दारु पिण्यास बंदी घालण्याबाबतचे हे पत्र आहे. मुंबईतील खार(प) येथील संकल्प युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष माणिक भवार यांनी शिक्षकांमध्ये असलेल्या व्यसनाधितनेबाबत ३ फेब्रुवारी २०१६ रोजी एक लक्षवेधी पत्र शालेय शिक्षण व क्रीडा विभागाला पाठविले होते. या पत्राचा संदर्भ देऊन शिक्षण संचालकांनी व्यसनाधीन शिक्षकांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. राज्यातील शाळांमधील शिक्षक तंबाखू, विडी, खर्रा, दारु इत्यादी पदार्थांचे सेवन करुन शिकवत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याचे अत्यंत वाईट परिणाम विद्यार्थ्यांवर होऊन तेदेखील हळूहळू व्यसनाधीन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही विद्यार्थी व्यसनाधीनही झालेले आहेत. ग्रामीण भागात अशा शिक्षकांचे प्रमाण जास्त असल्याचे माणिक भवार यांनी आपल्या निवेदनात नमूद केले होते. अशा शिक्षकांवर कठोर कारवाई करुन त्यांची बढती, शिक्षक पुरस्कार तसेच शासनाच्या सुविधांपासून त्यांना वंचित करावे, शिवाय जे शिक्षक आदेशाचे पालन करणार नाहीत, त्यांना ताबडतोब निलंबित करावे, असे आदेश शिक्षण संचालकांनी दिले आहेत.

विशेष म्हणजे, शिक्षकांच्या व्यसनाधीनतेबाबतचा मुद्दा विधिमंडळाच्या अधिवेशनातही उपस्थित करण्यात आला होता. त्याचा अहवालही देणे शासनाला अपेक्षित आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शिक्षकांची एकूण संख्या, तंबाखू, विडी, खर्रा, दारु व पानाचे सेवन करुन शिकवत असलेल्या शिक्षकांची संख्या, कारवाई केलेल्या शिक्षकांची संख्या अशाप्रकारच्या तक्त्यात माहिती भरुन शिक्षणाधिकाऱ्यांना संचालकांना अहवाल पाठवावा लागणार आहे. या आदेशाची किती प्रभावीपणे अंमलबजावणी केली जाते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.