माओवाद्यांचे १० व ११ ऑक्टोबरला देशव्यापी बंदचे आवाहन

0
11
गडचिरोली,berartimes.com दि.२१: देशातील बुद्धीजीवी वर्गाला मानसिक व शारीरिक त्रास देऊन मानवाधिकाराचे उल्लंघन करणे, महिलांवरील अत्याचार, सरकारचे साम्राज्यवादी व भांडवलवाद्यांना पोषक असलेले धोरण व ऑपरेशन ग्रीन हंटची आक्रमक भूमिका या विरोधात माओवाद्यांच्या केंद्रीय कमिटीने ५ ते ११ ऑक्टोबरदरम्यान देशव्यापी विरोध सप्ताह व १० आणि ११ ऑक्टोबरदरम्यान देशव्यापी बंदचे आवाहन केले आहे.या विरोधात ५ ते ११ ऑक्टोबरदरम्यान देशव्यापी विरोध सप्ताह व १० आणि ११ ऑक्टोबरदरम्यान देशव्यापी बंद पुकारण्यात आल्याचे माओवादी कम्युनिस्ट पक्षाचा प्रवक्ता अभय याने म्हटले आहे.
यासंदर्भात प्रतिबंधीत माओवादी कम्युनिस्ट पार्टीचा केंद्रीय प्रवक्ता अभय याने पत्रक जारी केले आहे. पत्रकात अभयने म्हटले आहे की, सरकार देशभरातील माओवादी समर्थक असलेल्या बुद्धीजीवींना मानसिक व शारीरिक त्रास देत आहे. मोदी सरकार आल्यापासून बुद्धीजीवी व महिलांवरील अत्याचारात वाढ होत आहे. विशेष म्हणजे, माओवादी असलेल्या भागात सरकार ऑपरेशन ग्रीन हंटच्या नावाखाली युद्ध झेडत असून, हवाई हल्ले करण्याची योजना आखत आहे, असा आरोपही नक्षलप्रवक्ता अभय याने केला आहे. माओवाद्यांचे निर्मुलन करण्यासाठी सरकारने दंडकारण्यात ‘मिशन २०१६’, बिहार, झारखंडमध्ये ‘ऑपरेशन फिनिश व ऑपरेशन महादेव’,’ऑपरेशन ब्रेक’, आंध्रप्रदेश-ओडिसा सीमेवर ‘ऑपरेशन ब्लू मून’, झारखंडमध्ये ‘ऑपरेशन विश्वास’ सुरु केले असून, मोठ्या प्रमाणावर सैनिक व अर्धसैनिक दलांना तैनात करण्यात येत आहे. या जवांनाकडून सामान्य नागरिकांना त्रास होत असल्याचा आरोप माओवादी पार्टीचा प्रवक्ता अभय याने केला आहे.

विशेष म्हणजे, आदिवासी भागातील जनतेने जल, जंगल व जमिनीचे जतन केले आहे. परंतु सरकार या तिन्ही बाबी साम्राज्यवादी व भांडवलवाद्यांच्या ताब्यात देत आहे. नैसर्गिक संपत्ती उद्योगपतींच्या घशात घालण्यासाठी सरकार राजकीय नेते, प्रशासन व पोलिसांनाही कामाला लावत असून, ठिकठिकाणी हेलिपॅड तयार करुन हवाई हल्ल्यांद्वारे माओवाद्यांना नष्ट करु इच्छित आहे, असा गंभीर आरोपही अभयने केला आहे.