आदिवासी आश्रम शाळेची मान्यता रद्द करणार – विष्णू सावरा

0
8
खामगाव,दि. 04 – तालुक्यातील पाळा येथील स्व.निंबाजी कोकरे आदिवासी आश्रम शाळेची मान्यता रद्द करण्याचे आदेश आदिवासी आयुक्तांना दिले आहेत. त्याचप्रमाणे दोषी शिक्षक व कर्मचा-यांना निलंबीतही करण्यात येणार असल्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णु सावरा यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले. तालुक्यातील पाळा येथील आदिवासी मुलीवर अत्याचार प्रकरणी आश्रम शाळेची पाहणी करण्यासाठी जात असलेल्या आदिवासी विकास मंत्र्यांसह, भाजपनेत्यांना स्थानिक आदिवासींच्या रोषाला शुक्रवारी सामोरे जावे लागले. यावेळी खामगाव-पाळा मार्गावर अंत्रज येथे आदिवासी नागरीकांनी मंत्र्यांचा ताफा अडविला. त्यापुर्वी युवक काँग्रेसच्या पदाधिका-यांनीही मंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखविले.
पाळा येथील आदिवासी आश्रम शाळेमध्ये घडलेली घटना अत्यंत निंदनीय आहे. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच सदर प्रकरणाचे दोषारोपपत्र ३० दिवसाचे आंत न्यायालयात दाखल करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सावरा यांनी सांगितले. आरोपींना तातडीने शिक्षा व्हावी यासाठी सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याबाबतही शासन प्रयत्नशील आहे. प्रकरणाचा योग्य तपास व्हावा यादृष्टीने या प्रकरणात एसआयटी देखील नेमली असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्याप्रमाणे वरिष्ठ महिला अधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली संपुर्ण प्रकरणाच्या तपासणीसाठी विशेष समितीही स्थापन केल्या जाणार आहे. आदिवासी आयुक्तांना आश्रम शाळा रद्द करण्याबाबत आदेश दिले असून ही आश्रम शाळा रद्द केल्यानंतर या शाळेमधील विद्यार्थ्यांना विविध तीन जिल्ह्यांमधील शाळांमध्ये प्रवेश देण्याबाबतही आदिवासी आयुक्तांना निर्देश देण्यात आल्याचे आदिवासी विकास मंत्री सावरा यांनी याप्रसंगी सांगितले. पत्र परिषदेला  कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, माजी मंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे, आमदार अ‍ॅड.आकाश फुंडकर, आमदार डॉ.अशोक उईके उपस्थित होते.