भैयालाल भोतमांगे यांचे निधन

0
5

भंडारा/गोंदिया-दि.20- भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील खैरलांजी हत्याकांडातील एकमेव साक्षीदार भैयालाल भोतमांगे यांचे आज शुक्रवारला(दि.20) निधन झाले. नागपूरच्या श्री कृष्णा हॉस्पिटलमध्ये ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. न्यायासाठी भैयालाल भोतमांगे यांनी मोठा संघर्ष केला.सुप्रीम कोर्टाचा निर्णय येण्याआधी त्यांच्या निधनामुळे आज एका संघर्षाचा शेवट झाल्याची भावना दलित समाजातून व्यक्त होत आहे.

29 सप्टेंबर २००६ रोजी भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातल्या खैरलांजी गावात राहणाऱ्या भोतमांगे कुटुंबियांवर गावातल्याच काही लोकांकडून अमानुष हत्या करण्यात आली. आरोपींनी भोतमांगे कुटुंबातील सुरेखा (३८), प्रियंका (१८), सुधीर (२२) आणि अंध रोशन (१८) या चौघांची जातीवाचक शिवीगाळ करून काठय़ा आणि सायकलच्या चेनने मारहाण करून हत्या केली. महिलांचा विनयभंग करून त्यांचे निर्वस्त्र मृतदेह बैलगाडीत टाकून साडेतीन किलोमीटर अंतरावरील कालव्यात फेकून देण्यात आले. ही घटना घडताना या अमानुष हल्ल्यातून एकमेव व्यक्ती बचावली होती,ती व्यक्ती म्हणजे भैयालाल भोतमांगे होय. भैय्यालाल भोतमांगे यांच्यामुळेच सदर हत्याकांड उघडकीस आले होते.

या हत्याकांडाचे पडसाद विधिमंडळापासून संसदेपर्यंत उमटले. आंतरराष्ट्रीय स्तरावरही या घटनेची दखल घेण्यात आली. घटनेनंतर राज्यभर आंदोलनांचे लोण उसळले. घटनेनंतर सुमारे सात महिन्यांनी दाखल झालेल्या आणि पंधरा महिने चाललेल्या खटल्याचा निकाल 15 सप्टेंबर २००८ रोजी लागला. न्यायालयाने आठ आरोपींना दोषी ठरवले.