१६ संचालक, अधिकाऱ्यांना तुरुंगवास

0
17

बीड,दि.८: राज्यभर गाजलेल्या बीड जिल्हा सहकारी बँक घोटाळा प्रकरणी मंगळवारी येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी वी.म.सुंदाळे यांनी १६ जणांना दोषी ठरवत प्रत्येकी पाच वर्षे तुरुंगवास व ६० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. तर तिघे गुन्हा नोंद झाल्यापासून फरार असून उर्वरित १५ जणांना न्यायालयाने निर्दोष ठरविले. शिक्षा झालेल्यांमध्ये माजी अध्यक्ष राजाभाऊ मुंडे यांच्यासह आठ संचालक व बँक अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
बीड जिल्हा बँकेतर्फे २ कोटी ७५ लाख ५० हजार रुपयांचे बेकायदेशीर कर्जवाटप केल्याचे हे प्रकरण आहे.घाटनांदूर येथील शेतकरी सहकारी तेलबिया कृषी प्रक्रिया संस्थेस या बँकेने २०११ साली २ कोटी ७५ लाख ५० हजार रुपयांचे कर्ज प्रकरण मंजूर केले होते. या कर्ज प्रकरणाचे विभागीय लेखा परीक्षक रवींद्र गोदाम यांनी लेखा परीक्षण केले. त्यात प्रक्रिया संस्थेने बोगस सभासद दाखवून कर्ज उचलून बँकेची फसवणूक केल्याचे समोर आले. गोदाम यांनी ३० जून २०११ रोजी ग्रामीण ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून ३४ जणांवर फसवणूक व बनावट कागदपत्रे तयार करून विश्वासघात केल्याच्या कलमाखाली गुन्हा दाखल झाला होता.