पाकिस्तानात सुरु झाली 2 हजार रुपयांच्या बनावट नोटांची छपाई

0
16

नवी दिल्ली, दि. 13 – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्या विविध कारणांसाठी नोटाबंदीचा इतका मोठा निर्णय घेतला त्यातील एक प्रमुख कारण होते पाकिस्तानात छापल्या जाणा-या बनावट नोटा. भारतीय चलनातील 500 आणि 1 हजार रुपयांच्या बनावट नोटा मोठया प्रमाणात पाकिस्तानात छापल्या जात होत्या. हे सुद्धा नोटाबंदीच्या निर्णयामागचे एक प्रमुख कारण होते.
पण आता पाकिस्तानने पुन्हा एकदा भारतीय चलनातील 2 हजार रुपयांची बनावट नोटा छापण्यास सुरुवात केल्याचे वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिले आहे. या नोटा तस्करांमार्फत भारत-बांगलादेश सीमेवरुन भारतात आणल्या जात असल्याची माहिती आहे. एनआयए आणि बीएसएफने मुर्शिदाबाद येथून अटक केलेल्या अझीझूर रहमानच्या (26) चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
तो मूळचा पश्चिम बंगालमधील मालदाचा निवासी आहे. त्याच्याकडे 2 हजार रुपयांच्या 40 बनावट नोटा सापडल्या. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयच्या मदतीने या नोटा पाकिस्तानात छापण्यात आल्याची माहिती त्याने चौकशीत दिली. बांगलादेश सीमेवरुन या नोटांची तस्करी चालते असे त्याने सांगितले.