पोवार समाजाने ओबीसी आंदोलनात सहभागी व्हावे-आ.रहांगडाले

0
10

तिरोडा,berartimes.com दि.१३- तालुक्यातील वडेगाव येथे आयोजित राजाभोज जयंती महोत्सानिमित्त कार्यक़्रमाचे उद्घाटक म्हणून बोलताना तिरोडा विधानसभा मतदार संघाचे आमदार विजय रहांगडाले यांनी आपल्या समाजाला सामुहिक विकासात आघाडी घेण्याची गरज असून संवैधानिक अधिकार प्राप्तीसाठी ओबीसींच्या लढ्यात सहभागी होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. वडेगाव येथे राजाभोज जयंती निमित्त रविवारी (दि.१२) सकाळी मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर रात्रीला पोवारी सांस्कृतीक गीताचे कार्यक़्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक़्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बँक़ेचे माजी उपाध्यक्ष राधेलाल पटले होते. रंगपूजक म्हणून माजी आमदार डॉ. खुृशाल बोपचे यांच्यासह माजी जि.प. सदस्य अशोक ठाकरे, सरपंच ढुमेश्वरी बघेले, अनुप बोपचे, खेमेंद्र कटरे, रामकृष्ण गौतम, बंसीधर शहारे, तेजराम चव्हाण, प्रा.तुरकर यांच्यासह मंचावर इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी सरपंच श्रीमती बघेले यांनी आपल्या मुलींना शिक्षणाची संधी उपलब्ध करुन त्यांना प्रशासनीक सेवेत पाठविण्यासाठी प्रोत्साहित करण्याची गरज असल्याचे विचार व्यक्त केले.माजी आमदार डॉ. बोपचे यांनी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या लढ्याची माहिती दिली.तसेच ८ डिसेंबरच्या मोच्र्यात लाखोंच्या संख्येने ओबीसी सहभागी झाल्यानेच राज्यसरकाला ओबीसी मंत्रालयाची घोषणा करावी लागल्याचे सांगत प्रशासनिक सेवेत आपले मुले गेली पाहिजे यासाठी ओबीसी आंदोलनाला गती देण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष पटले यांनी महाराष्ट्रातही ५० फुट उंचीची राजाभोज यांची प्रतिमा स्थापन करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आवाहन केले.आयोजनासाठी वडेगाव येथील क्षत्रिय राजाभोज पोवार समितीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.