विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी बंद

0
7

मुंबई दि. 16 – विधिमंडळ अधिवेशनाचा पहिला आठवडा शेतकरी कर्जमाफीने आज वादळी ठरला. सर्वपक्षीय आमदारांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीचा मुद्दा धसास लावल्याने विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले. विधान परिषदेत, विरोधकांनी राज्यपालांच्या अभिभाषणाच्या वैधानिकतेवर आक्षेप घेत सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आव्हान दिले. तसेच कर्जमाफीचा प्रस्ताव मतास टाकण्याची मागणी करून भाजपला एकटे पाडण्याची खेळी खेळत कामकाज दिवसभरासाठी बंद पाडले.
विधानसभेत कर्जमाफीच्या मुद्द्यावर आमदार आक्रमक पद्धतीने अडून बसल्याने या गोंधळात पुरवण्या मागण्या मंजूर केल्या गेल्या. गोंधळामुळे सुरवातीला तीनदा स्थगिती दिल्यानंतर शेवटी संपूर्ण दिवसासाठी कामकाज तहकूब करावे लागले. विरोधक आणि शिवसेना, तसेच भाजपच्या सदस्यांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून घोषणाबाजी सुरू करत वेलमध्ये उतरायला सुरवात केली. सदस्य वेलमध्ये उतरण्याच्या अगोदरच अध्यक्षांनी कामकाज अर्ध्या तासासाठी स्थगित केले. यानंतर 11.05 वाजता कामकाज सुरू झाल्यानंतर अवघ्या एका मिनिटात पुन्हा अर्ध्या तासासाठी कामकाज तहकूब केले. बारा वाजता मुख्यमंत्री आल्यानंतर शोक प्रस्ताव मांडला गेला. महाडचे माजी आमदार चंद्रकांत देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर लगेच सदस्यांनी पुन्हा गोंधळ सुरू केला. या गोंधळात पुरवणी मागण्या, तसेच काही विधेयके मंजूर करण्यात आली. गोंधळ वाढत चालल्याने सभागृह पुन्हा 15 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. यानंतर पुन्हा कामकाज सुरू झाल्यावर काही विधेयके विचारात घेतली गेली. यातच शालेय शिक्षणमंत्री तावडे यांनी एक निवेदन मांडले. शेतकरी कर्जमाफीच्या मागणीचा जोर वाढत चालल्याने आणि सदस्य अधिक आक्रमक झाल्याने शेवटी 12.38 वाजता सभागृह संपूर्ण दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

सभागृहाबाहेर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी कामकाज सुरू होण्याच्या आधी अर्धा तास पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी केली. या वेळी निषेधाचे फलक घेऊन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते अजित पवार, जयंत पाटील यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते. शिवसेनेच्या सदस्यांनी मात्र आज सभागृहाबाहेर निदर्शने टाळत सभागृहातच आवाज वाढवलेला दिसला.