कर्जमाफीसाठी शेतकरी प्यायले मूत्र, उद्या विष्ठा खाण्याचा दिला इशारा

0
6
नवी दिल्ली, दि. 22(वृत्तसंस्था) – कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी महिन्याभरापासून जंतरमंतरवर निदर्शनं करणा-या तामिळनाडूतील शेतक-यांचा संयम आता टोक गाठण्याची शक्यता आहे. याचे उदाहरण सांगायचे झाले तर आपल्या मागण्यांसाठी निरनिराळ्या मार्गांनी आंदोलन करणा-या या शेतक-यांनी आज चक्क मूत्र प्राशन केले आहे. ‘आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर शनिवारी मूत्र प्राशन करणार, मात्र जर याकडेही केंद्र सरकारने लक्ष दिले नाही  तर रविवारी स्वतःची विष्ठा खाऊन सरकारचा निषेध करू’, अशी धमकीवजा इशारा या शेतक-यांनी दिला आहेकाही दिवसांपूर्वी आंदोलक शेतकऱ्यांपैकी सात जणांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी पंतप्रधान कार्यालयात नेण्यात आले होते. मात्र मोदींच्या व्यस्त वेळापत्रकामुळे शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ आणि पंतप्रधानांची भेट होऊ शकली नाही. वारंवार निराशा होत असल्यानं अखेर शेतक-यांनी आज मूत्र प्राशन करत सरकारचा निषेध व्यक्त केला व सोबत उद्या विष्ठा खाण्याचा इशारा दिला आहे.
गेल्या 38 दिवसांपासून हे शेतकरी निरनिराळ्या मार्गांनी आंदोलन करत असल्यानं चर्चेत आहे. याआधी मानवी हाडे घेऊन या शेतक-यांनी आंदोलन केले होते. आत्महत्या केलेल्या शेतक-यांचे सांगाडे असल्याचा दावा त्यांनी केला होता. तर कधी विवस्त्र होऊन, कधी रस्त्यांवर सांबार-भात खाऊन निदर्शनं केली आहेत, इतकेच नाही तर कधी साप तसेच उंदीर खाऊनही यांनी आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी निदर्शनं केली आहेत. पण सरकारनं अद्यापपर्यंत त्यांच्या आंदोलनाची दखल घेतलेली नाही. त्यामुळे दिवसेंदिवस या शेतक-यांचे आंदोलन आक्रमक होत असल्याचे दिसत आहे.