सिक्कीममध्ये भारतीय लष्कराचे दोन बंकर केले चीनने उद्ध्वस्त

0
15

नवी दिल्ली, दि. 26 – चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीनं पुन्हा एकदा भारतीय हद्दीत घुसखोरी केली आहे. चिनी सैनिकांनी सिक्कीममध्ये भारतीय नियंत्रण रेषा ओलांडून भारताचे दोन बंकर उद्ध्वस्त केले आहेत. मात्र भारतीय लष्कराने 10 दिवस त्यांना घेराव घालून रोखले आहे.चीनने कैलाश मानसरोवर यात्रेसाठी जाणा-या भाविकांनाही थांबवले आहे. चिनी सैनिकांनी सिक्कीम, भूटान आणि तिबेटच्या सीमेवरील डोका ला येथे घुसखोरी केली आहे. 2008मध्येही चिनी सैनिकांनी भारतीय हद्दीत घुसखोरी करत भारताचे बंकर उद्ध्वस्त केले होते. डोका ला भागातल्या लालटेन भागात चिनी सैनिकांनी भारतावर कुरघोडी करण्याच्या दृष्टीनं ही कारवाई केली आहे. भारतात घुसखोरी करण्यापूर्वी चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीची एक बैठकही झाली होती.

मात्र 20 जून रोजी झालेल्या या बैठकीत कोणताच तोडगा निघाला नव्हता. त्यानंतर घुसखोरी करणा-या चिनी सैनिकांना रोखण्यासाठी भारतीय लष्करानं मानवी साखळी बनवली आहे. काही भारतीय जवानांनी चिनी सैनिकांचे व्हिडीओसुद्धा बनवले आहेत. चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी लागोपाठ भारतीय क्षेत्रात घुसखोरी करण्याचे प्रयत्न करत आहे. मात्र भारतीय लष्करानं त्यांना प्रत्यक्ष नियंत्रण रेषे(एलएसी)वर रोखून धरलं आहे.