कापेवंचा-कवठाराम जंगलात ठार झालेल्या नक्षल्याची ओळख पटली

0
10

गडचिरोली,दि.२४: अहेरी तालुक्यातील राजाराम खांदला उपपोलिस ठाण्यांतर्गत कापेवंचा-कवठाराम जंगलातील चकमकीत ठार झालेल्या नक्षल्याची ओळख पटली असून, मंगरु उर्फ राम चिन्ना पोरतेट(४८) असे त्याचे नाव आहे.
काल(ता.२३) संध्याकाळी प्राणहिता पोलिस मुख्यालयातील विशेष अभियान पथकाचे जवान कापेवंचा-कवठाराम जंगलात नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना पोलिस व नक्षल्यांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर आत्मसमर्पित नक्षल्यांच्या मदतीने त्याची ओळख पटविण्यात आली. मंगरु उर्फ राम चिन्ना पोरतेट असे मृत नक्षल्याचे नाव असून, तो मरपल्लीनजीकच्या भस्वापूर येथील रहिवासी आहे. अहेरी दलममध्ये एरिया कमिटी मेंबर म्हणून तो कार्यरत होता. शासनाने त्याच्यावर ६ लाखांचे बक्षीस ठेवले होते. ४० हून अधिक गुन्ह्यांत त्याचा सहभाग होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. गेल्या पंधरा दिवसांत पोलिसांनी ४ नक्षल्यांचा खात्मा केल्याने नक्षल चळवळीला जबर हादरा बसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.