नितीशकुमारांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, 20 महिन्यांत तुटली जदयू-राजद युती

0
9

पाटणा,दि.26(वृत्तसंस्था)- बिहार सरकारच्या सत्ताधारी आघाडीतील संघर्ष आता शिगेला पोहोचला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राजीनामा दिला आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी राजीनामा द्यावा आणि स्पष्टीकरण द्यावे अशी नितीश कुमारांची इच्छा होती. मात्र, तेजस्वीचा राजीनामा घेण्यास राजद अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी आडकाठी केल्यानंतर नितीशकुमार नाराज झाले होते. तेजस्वी यादव यांचा राजीनामा घेण्यात ते अपयशी ठरत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे.
बुधवारी संध्याकाळी पाटणामध्ये नितीश कुमारांनी जदयूच्या आमदारांची,खासदारांची आणि इतर नेत्यांची बैठक बोलावली होती. बैठकीनंतर नितीश राज्यपालांना भेटायला गेले. राज्यपालांना भेटून त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.सीबीआयने भ्रष्टाचाराच्या आरोपावरून तीन आठवड्यांपूर्वी पाटण्यात राजदचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव व त्यांचे पुत्र तेजस्वी यादव यांच्या निवासस्थानांवर छापे मारले होते. नितीश कुमार हे कोणत्याही स्थितीत आपली व आपल्या सरकारची प्रतिमा मलिन होऊ देण्यास तयार नव्हते.

“आम्ही युतीधर्माचे पालन केले. मात्र या परिस्थितीत काम करणे आता शक्‍य नाही. मी चांगले काम करण्याचा प्रयत्न केला. परंतु राजीनाम्याचा हा निर्णय माझ्या अंतरात्म्याचा आवाज आहे,” अशी प्रतिक्रिया नितीशकुमार यांनी या पार्श्‍वभूमीवर बोलताना व्यक्त केली. राजीनामा देण्याआधी नितीशकुमार यांनी त्यांच्या निवासस्थानी जदयुच्या आमदारांची बैठक घेतली व यानंतर राज्यपालांची भेट घेत त्यांच्याकडे राजीनामा सोपविल्याचे सूत्रांनी सांगितले. तेजस्वी यांचा राजीनामा मागितल्याचे वृत्त नितीशकुमार यांनी फेटाळून लावले.

बिहारमधील जेडीयू-आरजेडी-काँग्रेस महाआघाडी फुटीच्या मार्गावर असल्याची जोरदार चर्चा सुरु होती. त्यातच लालू प्रसाद यादव यांनी ही चर्चा वायफळ असल्याचे म्हटले आहे. महाआघाडी तुटण्याचा प्रश्नच नसल्याचे ते म्हणाले. लालू यादव म्हणाले, ‘ नितीशकुमारांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर तेजस्वी यादव यांचा राजीनामा मागितलेला नाही. या प्रकरणात मीडियालाच अधिक स्वारस्य आहे. नितीशकुमार आमचे नेते आहेत. ‘महाआघाडीत फूट’ या मीडियातून पसरवल्या जाणाऱ्या अफवा आहेत.’

बिहारमधील राजकीय स्थिती
संयुक्त जनता दल : 71
राष्ट्रीय जनता दल : 80
कॉंग्रेस : 27
भाजप : 53
लोकजनशक्ती पक्ष : 2
———-
बहुमत : 122