फवारणी करताना विदर्भात 18 जणांचा मृत्यू

0
23

यवतमाळ,दि.01 : शेतामध्ये पिकावर फवारणी करताना विषबाधा झाल्यामुळे विदर्भात 18 शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याने विदर्भातील शेतकऱ्यांच्या जीवावर कोण उठलेय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.पिकावर फवारणी करताना किटकनाशकांमुळे शेतकऱ्यांना विषबाधा झाली. यवतमाळ जिल्ह्यात किटकनाशक फवारणी करताना तब्बल 369 शेतकऱ्यांना  गेल्या तीन महिन्यात विषबाधा झाली असून त्यातील 7 शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला. रोज नवीन 10 ते 12 रुग्ण यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात दाखल होत आहेत. विशेष म्हणजे याच रुग्णालयातील वार्ड क्रमांक 12 मध्ये 40 बेड असून 40 बेडवर फवारणीतून विषबाधा झालेले शेतकरी उपचार घेत मृत्यूशी झुंज देत आहेत. तर 6 जण व्हेंटिलेटरवर आहेत.कपाशी आणि सोयाबीनवर पावसाचा मोठा खंड पडल्याने किडींचा मोठ्या प्रमाणात पादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकरी जहाल किटकनाशके पिकांवर फवारणी करत आहेत. मात्र फवारणी करताना शेतकरी योग्य ती काळजी घेत नसल्याने विषबाधा होत आहे.अकोला जिल्ह्यात 5  शेतकऱ्यांचा विषबाधा झाल्याने मृत्यू झाला आहे.तसेच इतर जिल्ह्यात सुध्दा अशा घटना घडल्या आहेत.