नक्षल्यांनी पेरलेले ८ किलो भुसूरूंग स्फोटके पोलिसांनी केली निकामी

0
12

आलापल्ली(सुचित जम्बोजवार)दि.07 : भामरागड उपविभागातील ताडगाव पोलिस मदत केंद्राच्या हद्दीत ताडगाव – पेरमिली मार्गावर नक्षल्यांनी बॅनर लावून त्याखाली भुसूरूंग स्फोटके पेरून ठेवली होती. ही माहिती मिळताच आज ७ नोव्हेंबर रोजी पोलिस अधीक्षक डाॅ. अभिनव देशमुख, अपर पोलिस अधीक्षक अहेरी यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे यांच्या नेतृत्वात क्युआरटी पथक, ताडगाव पोलिस मदत केंद्र व सिआरपीएफच्या जवानांनी स्फोटके निकामी केली आहेत.
नक्षल्यांनी बॅनर व पत्रके लावून अंदाजे १ – १ किलोचे ५ ब्लाॅस्ट, ३ किलो वजनाचा १ ब्लाॅस्ट असे ८ किलो वजनाचे ६ ब्लाॅस्ट पेरून ठेवले होते. पोलिसांनी घटनास्थळीच स्फोटके निकामी केल्याने नक्षल्यांचे मनसुबे उधळल्या गेले आहेत.
सदर कामगिरी उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे, क्युआरटी पथकाचे पोलिस उपनिरीक्षक राजरत्न खैरनार, पोलिस मदत केंद्र ताडगावचे पोलिस उपनिरीक्षक होनमाने, सिआरपीएफच्या ९ व्या बटालियनचे सहाय्यक कमांडंट मुनीर खाॅन यांनी केली आहे. यावेळी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोणतीही जिवित व वित्तहाणी न होवू देता नक्षल्यांचा कट उधळून लावण्यात पोलिस विभागाला यश आले आहे.