लातूरजवळ अपघातात सात ठार, तेरा जखमी

0
8

लातूर,दि.28(विशेष प्रतिनिधी) : क्लूजर वाहनाने रस्त्यावर उभारलेल्या आयशर टेम्पोसह समोरून येणाऱ्या दुसऱ्या क्लूजर वाहनाला धडक देऊन झालेल्या अपघातात सात जण जागीच ठार तर तेराजण जखमी झाले आहेत.लातूर – नांदेड रस्त्यावर लातूरपासून पाच किलोमीटर अंतरावरील कोळपा (ता. लातूर) गावाजवळील एका पुलाच्या कडेला आज (मंगळवारी) पहाटे साडेचार वाजता हा अपघात घडला. जखमींवर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

विवेकानंद पोलिस ठाण्याच्या सुत्रांनी सांगितले, की लातूर रोड (ता. चाकूर) येथील रेल्वेस्थानकात रेल्वेने आलेल्या प्रवाशांना घेऊन एक क्लूजर वाहन लातूरला येत होते. त्यात चालकासह दहाजण होते. या वाहनाने कोळपा गावाजवळील एका पुलाच्या कडेला उभारलेल्या आयशर टेम्पोला समोरून जोराची धडक दिली. याच वेळी समोरून येत असलेल्या दुसऱ्या क्लुजर वाहनालाही धडक दिली. या अपघातात लातूररोडहून आलेल्या क्लूजर वाहनाचे वरील छत पूर्ण फाटले व वाहनाचा चक्काचूर झाला. त्यातील सात जण जागीच ठार झाले तर चारजण जखमी झाले. यासोबत दुसऱ्या क्लूजरमधील नऊजण जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर सर्वोपचार रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघातातील मृतांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. विजय तुकाराम पांदे (वय ३०, रा. दापूर, ता. सिन्नर, जि. नाशिक), तुकाराम ज्ञानोबा दळवे (वय ३५, रा. दापेगाव, ता. औसा), उमाकांत सोपान कासले (वय ४०), मीना उमाकांत कासले (वय ४०, दोघेही रा. रेणापूर नाका, लातूर), शुभम शरद शिंदे (वय २४, रा. बेलपिंपळगाव, ता. जि. अहमदनगर), मनोज चंद्रकांत शिंदे (वय २५, रा. वैशालीनगर, बाभळगाव) व दत्तू बळीराम शिंदे (वय ३५, रा. हिंपळनरी, ता. मुखेड, जि. नांदेड). जखमींची नावे पुढील प्रमाणे आहेत. अर्जून रामराव राठोड (वय २७, परतूर, जि. जालना), शब्बीर बालेखॉं खान (वय १९, रा. निलंगा), कृष्णा दौलत भवर (वय १९, रा. नाशिक), मलिकार्जून गोविंद होडे (वय ३२, गातेगाव, ता. लातूर), वैष्णवी धनंजय भालेराव (वय १८, दिपज्योतीनगर, लातूर), मदन विठ्ठल पवार (वय २३, रा. औरंगाबाद), शेख इम्रान इम्तेयाज (वय १९, रा. चाकूर), गणेश उमाकांत कासले (वय १२, रा. रेणापूरनाका, लातूर), विद्या धनंजय भालेराव (वय ४२, दिपज्योतीनगर, लातूर), ज्ञानेश उमाकांत कासले (वय ११, रा. रेणापूरनाका, लातूर), रामराव मारोती घुगरे (वय ४९, रा. नाशिक), रविदास जयराम सानप (वय ३४, रा. नवी मुंबई) व अजय दयानंद वाघमारे (वय २४, लातूररोड, लातूर.) जिल्ह्यातील मागील काही दिवसापासून वाहनांच्या अपघाताचे सत्र सुरू असून सोमवारी औसा – निलंगा रस्त्यावर ट्रक व कारच्या धडकेत तीन ठार व दोन जखमी झाले होते. त्यापू्र्वी याच रस्त्यावर दहा दिवसापूर्वी सात ठार व चाळीसजण जखमी झाले होते.