पोलिसांशी झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी ठार

0
7

गडचिरोली दि.१३ः: जिल्ह्यातील कल्लेडच्या जंगलातील देचलीपेठा उपपोलीस ठाण्यांतर्गत कामासूर व येलाराम गावानजिकच्या जंगलात मंगळवारी सकाळी पोलीस व नक्षल्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक नक्षली ठार झाला.
सकाळी ९.३० ते १० वाजतादरम्यान ही चकमक झाल्याचे सायंकाळी पोलिसांनी अधिकृतरित्या कळविले. गेल्या ६ डिसेंबर रोजी कल्लेडच्या जंगलात पहाटे झालेल्या चकमकीत ७ नक्षलवादी मारले गेले होते तर काही नक्षलवादी जखमी झाले होते. पळून गेलेले नक्षलवादी कामासूर व येलाराम नजिकच्या जंगलात लपूस बसल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर कामासूर पहाडी परिसरात नक्षलविरोधी अभियान राबवित असताना मंगळवारी सकाळी चकमक उडाली. नक्षल्यांच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना पोलिसांच्या गोळीने एक नक्षलवादी ठार झाला. यावेळी काही नक्षलवादी जखमी झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली. चकमकीनंतर केलेल्या शोधमोहीमेत त्याचा मृतदेह आढळला. घटनास्थळी एक ३०३ रायफल व राऊंड, तसेच काही दैनंदिन वापराचे नक्षल साहित्य मिळाले.