शहिद प्रफुलचे पार्थिव पवनीत दाखल,आप्तेष्ठांसह नागरिकांच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा

0
101

पवनी(भंडारा),दि.24ः- काश्मिरच्या राजोरी जिल्ह्यातील केरी सेक्टरमध्ये पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात पवनीचा सुपूत्र मेजर प्रफुल अंबादास मोहरकर (३२) हे शहीद झाले. ही वार्ता रात्री पवनी तालुक्यात पसरताच त्यांच्या निवासस्थानी नागरिकांनी एकच गर्दी केली. घरी आईवडील नसतानादेखील शोकमय पवनीवासीय त्यांच्या घरासमोर एकत्रित होऊन आठवणींना उजाळा देत होते.त्यातच सकाळपासूनच प्रफुलच्या अंत्यदर्शनासाठी तालुक्यातीलच नव्हे तर जिल्ह्यातील नागरिकांनी पवनीच्या त्यांच्या घराकडे घेतलेली धाव रात्रीपर्यंत कायम होती.रात्री 10.50 मिनिटांनी शहिद प्रफुलचे पार्थिव शरीर जेव्हा पवनीत दाखल झाले तेव्हा एकच नारा गगनात एैकावयास मिळत होता,तो दुसरा कुठला नव्हे तर शहिद प्रफुल अमर रहे,शहिद प्रफुल जिंदाबाद याशिवाय दुसरे काहीच नव्हे.त्यातच आपला मुलगा,पती गेल्याचे दुःख आई आणि पत्नीच्या चेहर्यावरुन बघतांना अनेकांनी आपल्याच अश्रूंना वाट मोकळी करुन दिली होती.शहिद प्रफुलचे पार्थिव शरीर नागपूर विमानतळावर पोचताच विभागीय आयुक्त अनुपकुमार आणि सैन्यांच्या वरिष्ठ अधिकार्यांनी पुष्पचक्रवाहून श्रध्दाजंली वाहिली.

पवनीतील त्यांच्या घरी पार्थिवासोबत राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले,माजी खासदार नाना पटोले,विधानपरिषदेचे आमदार डाॅ.परिणय फुके,जिल्हाधिकारी,पोलीस अधिक्षकासंह सैन्याचे वरिष्ठ अधिकारी,उपविभागीय अधिकारी व जिल्ह्यातील वरिष्ट अधिकारी उपस्थित होते.शहिद प्रफुलचे पार्थिव आल्यानंतर लगेच पवनीतील सामाजिक स्मृती भवनात दर्शनासाठी ठेवण्यात आले होते.चारहीबाजूनी रस्त्यावर अलोट गर्दी होती. आई सुधाताई मोहरकर व पत्नी अबोलीने पार्थिव पोचताच सहकुंटूंब दर्शन घेत आपल्या अश्रूंना वाट मोकळी करुन दिली.

मोहरकर परिवार मूळचे पवनी तालुक्यातील जुनोना येथील रहिवाशी असून अंबादास मोहरकर हे वलनी येथील महात्मा गांधी विद्यालयात मुख्याध्यापक होते. सेवानिवृत्तीनंतर पवनीत भाईतलाव वॉर्डात घर बांधून ते स्थायिक झाले. मेजर प्रफुल यांची आई सुधाताई या शिक्षीका असून मोठा मुलगा मेजर तर लहान मुलगा पुणे येथे खासगी कंपनीत नोकरीला आहे. दरम्यान, शनिवारला लहान मुलाच्या भेटीसाठी ते नागपूरहून पुण्याकडे निघाले होते. दरम्यान, मोठा मुलगा प्रफुल हा चकमकीत शहीद झाल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथून रात्री उशिरा ते पवनीला पोहोचले. त्यावेळीही घरासमोर लोकांची गर्दी बघून मेजर प्रफुल्ल यांच्या आईने हंबरडा फोडला, तेव्हा अनेकांनी अश्रुंना वाट मोकळी करून दिली. जुनोना मूळगाव असले तरी आई भिवापूर तालुक्यात शिक्षिका असल्याने प्रफुल्ल यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मानोरी व पूर्व माध्यमिक शिक्षण तास ता.भिवापूर येथे झाले. आठवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण सोमलवार हायस्कुलमध्ये झाले. त्यावेळी प्रहारच्या उन्हाळी शिबिरात जात होता. तेव्हापासून त्यांना देशसेवेत रूजू होण्याचा ध्यास लागला होता. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात पहिल्या वर्षाला प्रवेश मिळाल्यानंतर एनडीएची परीक्षा देऊन मिलीटरी इंजिनियरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. डेहराडून, खडकवासला पुणे येथे शिक्षण पूर्ण करून राहुरी येथे लेफ्टनंट या पदावर ते रूजू झाले. त्यानंतर पदोन्नतीने अल्पावधीतच ते मेजर या प्रमुख पदावर पोहचले. मेजर म्हणून सीमावर्ती भागात टेहळणी करीत असताना पाकिस्तानी लष्करांच्या गोळीबारात त्यांना विरगती प्राप्त झाली.  पवनी तालुक्यात आतापर्यंत भारतीय सैन्यदलात मेजर या पदावर पोहचणारे ते पहिले होते. पवनीवासियांना त्यांचा सार्थ अभिमान होता. वीरपुत्राच्या दु:खामुळे पवनी येथील व्यापारी संघ व ड्रगिस्ट व केमीस्ट असोसिएशनने प्रतिष्ठाने बंद ठेऊन शोक पाळला.

पुणे येथील विजय शिंदे यांचा मुलगा मेजर अभिषेक आणि मेजर प्रफुल हे दोघेही एकाचवेळी सैन्यात दाखल झाले होते. सोज्वळ स्वभावामुळे शिंदे यांनी त्यांना मुलगी देण्याचे ठरविले. २४ डिसेंबर २०१३ रोजी अबोली हिचेसोबत त्यांचे नागपूर येथे लग्न झाले. आज त्यांच्या लग्नाचा चौथा वाढदिवस होता. त्यासाठी ते पुणे येथे येणार होते. परंतु आदल्या दिवशीच काळाने त्यांच्यावड झडप घातली. आणि सुखी संसाराचा डाव अर्ध्यावरती मोडला