राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्मोत्सवाचा उत्साह,केजरीवालांसह तीन राजे हजर

0
16

बुलडाणा,दि.12(विशेष प्रतिनिधी ) – राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जन्मोत्सवानिमित्त सिंदखेड राजा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जिजाऊंची 420 वी जयंती येथे साजरी केली जात आहे. या सोहळ्यासाठी खासदार छत्रपती संभाजीराजे, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले आणि छत्रपती बाबाजीराजे भोसले ,याशिवाय दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची प्रमुख उपस्थिती होती.

भारतीय जनता पक्ष (भाजप) दंगली घडविणारा पक्ष आहे, हवे तर मागील इतिहास पाहा. भाजप दंगली घडवून लोकांमध्ये भीती पसरवतोय. कोरेगाव भीमा येथे झालेला हिंसाचार हा भाजप व आरएसएसने घडवून आणल्याचा घणाघाती आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.भारतीय जनता पक्षाने (भाजप) शिवाजी महाराज तसेच सावित्रीबाईंच्या स्वप्नांचा चुराडा केला. महाराष्ट्रात ज्यांना शाळा चालवता येत नाहीत, ते सरकार काय चालवणार, असा सवालही केजरीवाल यांनी उपस्थित केला आहे.महाराष्ट्रात सर्वात वीज महाग का? कारण हे लोक उद्योगपतीशी मिळाले आहेत. शेतकरी आत्महत्या करत असताना भाजप काहीही करत नाही, कारण यांना गरीब, दलित, शोषित व शेतकर्‍यांचे काहीही देणे घेणे नाही. असे केजरीवाल यावेळी म्हणाले.दरम्यान, जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त आज बुलडाण्यातील सिंदखेड राजामध्ये आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने अरविंद केजरीवाल येथे दाखल झाले आहेत.

दरम्यान, सकाळी 7 वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीत जिजाऊंच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. सूर्योदयासमयी मराठा सेवा संघाचे प्रदेश अध्यक्ष डॉ. विजय घोगरे, वंदना घोगरे, जिजाऊ सुष्टीचे व्यवस्थापक सुभाष कोल्हे, अर्चना कोल्हे, जिजाऊ ब्रिगेड प्रदेश अध्यक्ष डॉ. रेखा चव्हान व  सहका-यांनी  जिजाऊंच्या प्रतिमेची महापूजा केली. तर  नगरपालिकेच्या वतीने नगर अध्यक्ष अ‍ॅड.नाझेर काझी, उपाध्यक्षा सिमा शेवाळे यांनी जिजाऊंच्या प्रतिमेची पूजा केली. यावेळी पालिकेच्या पदाधिकारी व स्थानिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी जाधव कुळाचे वंशज गणेश राजे जाधव, राजूकाका राजे जाधव, शिवाजी राजे जाधव, विजय राजे जाधव यांनी सहपरिवार महापूजा केली. सिंदखेड राजा मतदार संघाचे आमदार शशीकांत खेडेकर व शिवसेनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्यावतीने जिल्हा परीषदेच्या अध्यक्षा ऊमा तायडे व त्यांचे सर्व सहकारी व जिल्हा परिषदेचे अधिका-यांनी जिजाऊंना अभिवादन केले