३१ जानेवारी २०१८ ला ४ थे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबईत

0
25
संमेलनाध्यक्षपदी डॉ. विट्ठल वाघ तर मकरंद अनासपुरे करणार उद्घाटन
वर्धा,दि.30ः- शेतीक्षेत्रासमोरील समस्यांची मालिका दिवसेंदिवस वाढतच चालली असून त्यावर दीर्घकालीन उपाययोजना आखण्यासाठी कोणत्याच पातळीवर शर्तीच्या हालचाली होताना दिसत नाही. सद्यस्थितीत जात आणि धर्मासारख्या शुद्रावादात राजकीय, सामाजिक क्षेत्राबरोबरच सांस्कृतिक क्षेत्रही वाहवत चालले असून त्याचे गंभीर परिणाम शेतीक्षेत्राला भोगावे लागत आहेत. कधीकाळी उत्तम शेती असलेला व्यवसाय आता पार रसातळाला पोचला आहे. राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक स्तरावर अदखलपात्र ठरत चाललेल्या शेतीक्षेत्राची निदान भूमिपुत्र सारस्वतांनी तरी गांभीर्याने दखल घेऊन शासकीय धोरणासोबतच सामूहिक जनमानसाची पारंपरिक वैचारिक दिशा बदलू शकेल असे अभ्यास व  चिंतनाच्या बळावर कल्पनाविश्वाच्या बंदिस्त कोषातून बाहेर येत वास्तवाला प्रतिबिंबित करणारे सकस साहित्य निर्माण करण्यासाठी, कृषिजगताला भेडसावणार्‍या समस्यांची मराठी साहित्यविश्वासोबत सांगड घालण्यासाठी, नवसाहित्यिकांना सशक्त व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांच्या शेतीअर्थशास्त्र व नवतंत्रज्ञानाच्या जाणिवा समृद्ध करण्यासाठी, मराठी साहित्यक्षेत्राकडून कृषिजगताला असलेल्या अपेक्षांची जाणीव करून देण्यासाठी आणि लेखणीच्या माध्यमातून शेतीची दुर्दशा थांबवून शेतकर्‍याच्या आयुष्यात सुखाचे व सन्मानाचे दिवस खेचून आणण्याइतपत शक्तिशाली सृजनशील साहित्यिकांची नवीन पिढी निर्माण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्याचा एक इवलासा प्रयत्न म्हणून बुधवार, ३१ जानेवारी २०१८ रोजी  पु. ल. देशपांडे कला अकादमी, रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी, दादर, मुंबई  येथे चौथे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेले आहे.
विख्यात सिनेकलाकार मकरंद अनासपुरे यांचे हस्ते संमेलनाचे उदघाटन होणार असून  संमेलनाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक कवी डॉ. विट्ठल वाघ भूषविणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून  सौ. सरोजताई काशीकर तर ज्येष्ठ शेतकरी नेते विशेष अतिथी म्हणून रामचंद्रबापू पाटील उपस्थित राहणार आहेत. संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून सामाजिक कार्यकर्ते श्री अभिजित फाळके तर कार्याध्यक्ष म्हणून अ.भा.मराठी शेतकरी साहित्य चळवळीचे संस्थापक अध्यक्ष श्री गंगाधर मुटे जबाबदारी सांभाळत आहेत.
या मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे स्वरूप आपापल्या कौशल्यगुणांचं, प्रतिभेचं प्रदर्शन मांडून वाहवा मिळवणार्‍या हौश्या-गौश्या-नवश्यांचा जमाव यापुरतेच केवळ मर्यादित न राहता साहित्यिकांना कल्पनाविस्ताराठी बौद्धिक मेजवानी देणारे प्रशिक्षण शिबीर ठरावे आणि लेखणीच्या माध्यमातून शेतीची दुर्दशा थांबवून शेतकर्‍याच्या
आयुष्यात सुखाचे व सन्मानाचे दिवस खेचून आणण्याइतपत शक्तिशाली सृजनशील साहित्यिकांची नवीन पिढी निर्माण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्याचा उद्देश या संमेलन आयोजनामागे आहे.
या संमेलनात “आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि स्वामिनाथन आयोग”, “आलं वरिस राबूनं, आम्ही मरावं किती?”, “शेतकरी विरोधी कायद्यांचे जंगल”, “चला पुन्हा आयुष्याच्या पेटवू मशाली”, अशा विविध विषयावरील एकूण ४ परिसंवाद राहणार असून या परिसंवादात  गुणवंत पाटील (नांदेड), अजित नरदे (कोल्हापूर), संजय कोले (सांगली),  ललित बहाळे (अकोला), विजय निवल (यवतमाळ), सतीश दाणी (वर्धा), सिमा नरोडे (पुणे), शैलजा देशपांडे (वर्धा), प्रज्ञा बापट (यवतमाळ),  स्मिता गुरव (नासिक), गीता खांडेभराड (जालना), प्रिया लोडम (मुंबई), प्रा. मनिषा रिठे, अ‍ॅड दिनेश शर्मा, (वर्धा), अ‍ॅड प्रकाशसिंह पाटील, (औरंगाबाद), अ‍ॅड सतीश बोरुळकर (मुंबई), मधुसुदन हरणे (हिंगणघाट), अ‍ॅड. वामनराव चटप (चंद्रपूर), अनिल घनवट (अहमदनगर), कडुआप्पा पाटील (जळगाव), राजूभाऊ पुजदेकर (अमरावती), अभिमन्यू शेलार (पुणे) यांचेसहीत अनेक ज्येष्ठ साहित्यिक, ज्येष्ठ शेतकरी नेते, शेती अर्थशास्त्राचे गाढे अभ्यासक, अर्थतज्ज्ञ इत्यादी अनुभवी वक्ते भाग घेणार असल्याने हे या संमेलनाचे वैशिष्ट्यपूर्ण वेगळेपण असणार आहे.
शेतकरी कवी संमेलन आणि शेतकरी गझल मुशायरा असे दोन स्वतंत्र सत्र ठेवण्यात आले असून प्रशांत वैद्य (मुंबई), अनंत नांदुरकर (नागपूर), प्रवीण हटकर (अकोला), नितीन देशमुख (अमरावती), ईश्वर मते (गडचिरोली), रामकृष्ण रोगे, रवी धारणे, प्रदीप देशमुख (चंद्रपूर), रमेश सरकाटे (जळगाव), वीरेंद्र बेडसे (धुळे), विजय पाटील (नंदुरबार), अझीझखान पठाण (नागपूर), नजीमखान (बुलडाणा), विशाल राजगुरू, प्रा. प्रतिभा सराफ, एजाज शेख, जनार्दन म्हात्रे (मुंबई), सिद्धार्थ भगत (यवतमाळ), गंगाधर मुटे (वर्धा), हंसिनी उचित (वाशीम), बदीऊज्जमा बिराजदार (सोलापूर) या गझलकारांसोबतच विजय विल्हेकर (अमरावती), प्रा. वृषाली विनायक (मुंबई), किशोर बळी, श्याम ठक, सुनील अढाऊकर, श्री हिंमतराव ढाले (अकोला), दिलीप भोयर (अमरावती), अरविंद हंगरगेकर (उस्मानाबाद), अशोक गायकवाड (औरंगाबाद), रत्नाकर चटप, किशोर कवठे (चंद्रपूर), राजीव जावळे, ओंकार खांडेभराड (जालना), रावसाहेब कुवर (धुळे), प्रा.चित्रा कहाते (नागपूर), रवींद्र दळवी (नाशिक), संदीप गुजराथी (नासिक), मधुकर तराळे, विणा माच्छी (पालघर), विनिता माने-पिसाळ, रविंद्र कामठे (पुणे), लक्ष्मण लाड, सिद्धेश्वर इंगोले, केशव कुकडे, प्रज्ञा आपेगावकर (बीड), विशाल इंगोले (बुलडाणा), साहेबराव ठाणगे (मुंबई), लक्ष्मी बलकी (यवतमाळ), ईश्वरचंद्र हलगरे (रत्नागिरी), प्रदीप थूल, राजेश जौंजाळ, धीरजकुमार ताकसांडे, रविपाल भारशंकर, सुशांत बाराहाते, रंगनाथ तालवटकर, नारायणराव निखाते (वर्धा), चाफेश्वर गांगवे (वाशीम), संग्राम अनपट (सातारा) इत्यादी शेतकरी कवी मंडळी सहभागी होणार आहेत.
  “साहित्य हा समाजाचा आरसा असतो” असे म्हणतात. पण शेतीक्षेत्रातील वास्तवतेचं, वास्तवतेच्या दाहकतेचं प्रतिबिंब साहित्यात उमटलेलेच नाही. गेल्या १५-२० वर्षांमध्ये देशात ६ लाखापेक्षा जास्त शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत; पण त्याची दखल साहित्यक्षेत्राने गांभीर्याने घेतलेली दिसत नाही किंवा त्याचे प्रतिबिंब साहित्यात प्रभावीपणे उमटलेले सुद्धा आढळत नाही. शेतीतील गरिबीचे, ग्रामीण भारतातील दुर्दशेचे खरेखुरे कारण सांगणारे आणि तशी अभ्यासपूर्ण मांडणी करून योग्य मूल्यमापन करणारे तुरळक अपवाद सोडले तर साहित्यक्षेत्रात साहित्य उपलब्ध नाही. विदर्भप्रदेश गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्यांमध्ये होरपळत आहे पण शेतकरी आत्महत्यांवर सर्वंकश प्रकाश टाकणारे, खोलवर अभ्यासपूर्ण मांडणी करून शेतकरी आत्महत्यांच्या कारणांचा शोध आणि मागोवा घेणारे आज एकही पुस्तक उपलब्ध नसणे ही बाब साहित्यक्षेत्रासाठी शोभादायक नाही.
साहित्यक्षेत्रातील ही शेतीसाहित्याची उणीव भरून काढण्यासाठी शेतीशी प्रामाणिक व कटिबद्ध असणार्‍या लेखक-कवी-गझलकारांनी आता सर्व बंधने झुगारून, स्वत:चा अहंकार बाजूला सारून, वास्तवनिष्ठ, शास्त्रशुद्ध व तर्कसंगत विचाराची अत्युच्च पातळी गाठण्यासाठी प्रथम अभ्यासाला लागले पाहिजे. अभ्यासाला अनुभवाची जोड दिली पाहिजे. लेखनाला सुरवात करण्यापूर्वी शेतीअर्थशास्त्राच्या कसोटीवर आपले विचार तपासले पाहिजेत. जे लिहायला घेतले ते शेतीची बिकट समस्या सोडवण्यासाठी उपयोगी की उपद्रवी याचेही मंथन केले पाहिजे आणि नंतरच लेखनाला सुरुवात केली पाहिजे. काळ्या मातीशी इमान राखणारे लेखन करायचे असेल तर सृजनशीलतेला पहिल्यांदा भ्रामक कल्पनांतून बाहेर काढले पाहिजे. लेखनशैलीचा उपजतपणा, स्फूर्ती, प्रतिभा व परकाया प्रवेश वगैरे कल्पनांना टाळून कृत्रिम का होईना पण वास्तवाला चितारणारी अभ्यासपूर्ण लेखनशैली जाणीवपूर्वक विकसित करण्यासाठी या संमेलनाचे प्रयोजन आहे.
साहित्यक्षेत्रात आजपर्यंत झालेले लेखन बहुतांशी “शेतीच्या शोषणाला पोषक” असेच लिहिल्या गेलेले आहे आणि “मला जे स्फुरले ते मी लिहिले” हाच दृष्टिकोन त्याला मुख्यत्वे कारणीभूत आहे. साहित्य म्हणजे केवळ वाचकांच्या करमणुकीसाठी लिहायचे नसते, स्वत:ला महानतेकडे पोचविण्यासाठी व स्वत:चे लेखन साम्राज्य वाढविण्यासाठी तर अजिबातच लिहायचे नसते. वाचकाची दिशाभूल करण्याऐवजी त्याला विषयाची योग्य जाणीव करून देण्यासाठी लिहायचे असते, याची जाणीव नवसाहित्यिकांना होऊन दमदार शेतीसंबंधित साहित्यकृती निर्माण व्हावी, असा प्रयत्न शेतकरी साहित्य चळवळीच्या माध्यमातून केला जाणार आहे.
साहित्यक्षेत्रातील शेतीप्रधान साहित्याची उणीव भरून काढण्यासाठी अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ कार्यरत असून या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून २०१५ मध्ये पहिले अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन वर्धा येथे, २०१६ मध्ये दुसरे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन नागपूर येथे तर २०१७ मध्ये तिसरे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन गडचिरोली येथे आयोजित करण्यात आले होते.
या संमेलनात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून १००० पेक्षा जास्त मराठी भाषिक प्रतिनिधी, नामवंत साहित्यिक व ज्येष्ठ विचारवंत सहभागी होतील, असा आम्हाला विश्वास आहे.
संमेलनाच्या आयोजनासाठी नियोजन समिती, व्यवस्थापन समिती, आयोजन समिती, स्वागत समिती आणि सल्लागार समिती अशा पाच समित्या गठीत करण्यात आल्या असून या समित्यांचे अध्यक्ष म्हणून अनुक्रमे प्रा. भुपेश मुडे, प्रा. रमेश झाडे, प्रा. कुशल मुडे, जनार्दन म्हात्रे आणि ऍड सतीश बोरुळकर यांची निवड करण्यात आली आहे.