चकमकीत एक नक्षलवादी ठार

0
5

गडचिरोली, दि.५: नक्षलवाद्यांनी पुकारलेल्या दंडकारण्य बंदच्या पार्श्वभूमीवर आज पोलिसांच्या नक्षलविरोधी अभियानादरम्यान झालेल्या चकमकीत एक जहाल नक्षलवादी ठार झाला.नक्षल्यांनी आज दंडकारण्य बंदची घोषणा केली होती. यामुळे पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांच्या आदेशानुसार अपर पोलिस अधीक्षक(अभियान) डॉ.हरी बालाजी व अपर पोलिस अधीक्षक(नक्षल सेल) महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभरात नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आले होते. एटापल्ली उपविभागातील गट्टा(जांभिया)पोलिस मदत केंद्रांतर्गत मुरेवाडा जंगलात आज सी-६० पथकाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना दुपारी २ वाजताच्या सुमारास नक्षल्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर देताच नक्षलवादी जंगलात पसार झाले.त्यानंतर घटनास्थळाची पाहणी केली असता तेथे एका पुरुष नक्षल्याचा मृतदेह आढळून आला. तसेच एक ८ एमएम रायफल व अन्य साहित्यही सापडले. पोलिसांनी मृतदेह व नक्षल साहित्य ताब्यात घेतले आहे. मृत नक्षल्याची ओळख पटविण्याचे काम सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.