लाल सलाम, जयभीम व इन्कलाब जिंदाबादच्या घोषणांनी दुमदुमली एटापल्ली

0
11

‘ ना जान देंगे… ना जमीन देंगे‘ – आदिवासी क्षेत्र की जनता ने पुकारा भूमकाल.

गडचिरोली- आपल्या न्याय्य मागण्याच्या पूर्ततेसाठी एटापल्लीच्या भारत जन आंदोलन समितीच्या वतीने एटापल्ली उपविभागीय कार्यालयावर धडक मोच्र्याचे आयोजन आज (ता. १०) करण्यात आले होते. यावेळी हजारोंच्या संख्येने सहभागी झालेल्या आदिवासी बांधवांनी दिलेल्या लाल सलाम, जयभीम, इन्कलाब झिंदाबाद, ना जान देंगे… ना जमीन या घोषणांनी एटापल्लीचे आसमंत दुमदुमले.
आज १० फेब्रुवारी रोजी गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली येथे भारत जन आंदोलनाच्या वतीने एटापल्ली व भामरागड तालुक्यातील हजारो लोकांनी आपल्या अधिकारांच्या संघर्षासाठी रान पेटवले. उपविभागीय कार्यालयासमोर जमलेल्या समुदायाने यावेळी भुमकाल दिवस साजरा केला. आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी एटापल्ली उपविभागीय कार्यालयावर काढलेला मोर्चा हा ऐतिहासिक व लक्षवेधी मोर्चा ठरला.
कोणत्याही परिस्थितीत खासगी खाणी व प्रकल्पांसाठी आम्ही आपल्या जमिनी देणार नाही, अशा सगळ्या प्रकल्पांची मान्यता त्वरित रद्द करण्यात यावी, पेसा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, वन अधिकार कायद्याअंतर्गत प्रलंबित सामूहिक व वैयक्तिक दावे लवकर निकाली काढण्यात यावे, शिक्षण व आरोग्य सेवा सुरळीत करण्यात यावी, १८६० चा पोलिस अधिनियम रद्द करण्यात यावा, आदिवासी, दलित, व इतर शोषित गरीब जनतेचे आर्थिक शोषण व जातीय अत्याचार बंद करावे, सगळ्यांना ३००० रुपये पेन्शन देण्यात यावी, रेशन करिता असलेली कुपन व्यवस्था रद्द करावी, अशा इतर मागण्यांकरिता या संघर्ष मोच्र्याचे आयोजन करण्यात आले होते.
गट्टा रोड एटापल्ली येथे भूमकाल संमेलन साजरा करण्यात आला. आदिवासीच्या अधिकारांसाठी व आपल्या जल, जंगल, जमीन, संस्कृतीसाठी १० फेब्रुवारी १९१० ला मध्य भारतात भव्य असा विद्रोह आदिवासींनी केला होता. त्या विद्रोहाला चिरडण्यात आले होते. पण तिथे शहीद झालेल्या प्रत्येक शहीदांनी स्वशासन व संसाधनाच्या अधिकाराचा संघर्ष सतत तेवत ठेवला. आज त्यांच्या स्मृतीमध्ये ङ्कभूमकाल दिवसङ्क साजरा केला गेला. यावेळी मान्यवरांनी भूमकाल व सध्याची आदिवासींची स्थिती व संघर्षावर मार्गदर्शन केले. पारंपरिक पद्धतीत वाद्य व नृत्यांच्या गजरात मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला.
या मोर्चाला एटापल्ली व भामरागड तालुक्यातील सर्व ग्रामसभा, भूमिया, पेरामा, गायता व गावकरी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. भारत जन आंदोलनाचे एटापल्ली व भामरागड तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते सुद्धा यावेळी उपस्थित होते.
या मोर्चाचे नेतृत्व भारत जन आंदोलनचे जिल्हा सदस्य मा. बाजीराव उसेंडी, मा. सैनु गोटा, मा. महेश राऊत, मा. छत्रू नरोटे, मा. चंद्रा दल्लू कवडो, मा. नंदू मट्टामी, मा. जगन्नाथ नरो , मा. राजश्री लेकामी यांनी केले
यावेळी विशेष आमंत्रित भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव डॉ. महेश कोपुलवर, भारीप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष रोहिदास राऊत व अ‍ँड जगदीश मेश्राम हे प्रामुख्याने उपस्थित होते.