दिल्लीला हवा पूर्ण राज्याचा दर्जा- केजरीवाल

0
9

केजरीवालांची गृहमंत्र्यांकडे मागणी; “झेड‘ सुरक्षाही नाकारली
नवी दिल्ली – दिल्लीचे नियोजित मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह आणि नगरविकासमंत्री वेंकय्या नायडू यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान केजरीवाल यांनी प्रामुख्याने दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणी केली.

दिल्लीत नेत्रदीपक यश संपादन केल्यानंतर आम आदमी पक्षाने आता सरकार स्थापनेसाठी पुढाकार घेतला आहे. “आप‘चे समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी पक्षाचे वरिष्ठ नेते मनीष सिसोदिया यांच्यासमवेत प्रथम गृहमंत्री राजनाथसिंह यांची भेट घेऊन त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. या वेळी केजरीवाल यांनी दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा दिला जावा, अशी आग्रही मागणी केली. केजरीवाल यांनी स्वतः याबद्दल माहिती दिली. दिल्लीतील जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देणे कसे आवश्‍यक आहे, याबाबत आम्ही चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले.

मनीष सिसोदिया म्हणाले, ‘आम्ही विविध विषयांवर राजनाथसिंह यांच्याशी चर्चा केली. केंद्रानेही पक्षीय भेद न पाळता आम्हाला सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे.‘‘ दरम्यान, पूर्वीप्रमाणेच या वेळेसही अरविंद केजरीवाल यांनी “झेड प्लस‘ सुरक्षा स्वीकारण्यास नकार दिला आहे. या चर्चेची संधी साधत केजरीवाल यांनी राजनाथसिंह यांना शपथविधी कार्यक्रमाचे निमंत्रण दिल्याचे समजते. तत्पूर्वी केजरीवाल यांनी केंद्रीय नगरविकासमंत्री वेंकय्या नायडू यांची भेट घेऊन त्यांच्याशीही चर्चा केली. आपण सर्वांनी स्वत:ला “टीम इंडिया‘ समजून एकत्रितपणे काम करायला हवे, असे मत नायडू यांनी मांडले. केंद्र सरकार केजरीवाल यांना सर्वतोपरी मदत करेल, दिल्लीतील जनतेने पूर्णपणे त्यांच्या बाजूने कौल दिला असल्याने आता त्यांची जबाबदारी आणखीनच वाढली आहे, असेही नायडू यांनी केजरीवालांना सांगितले. केजरीवालांनी नायडूंकडेही दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा द्यावा, अशी मागणी केली.