सर जे. जे. रुग्णालयातील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे बाळाचा मृत्यू

0
8

# वडिलांकडून पोलीस ठाण्यात हत्येची तक्रार दाखल

मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) दि.१०ः  निष्काळजी आणि चुकीच्या उपचारामुळे सर जे. जे. रुग्णालयाने आपल्या २२ महिन्यांच्या मुलाची हत्या केली, असा आरोप वाळीव पोलीस ठाण्यात कार्यरत वसीम शेख (३३) यांनी रविवारी केला. तशी तक्रार त्यांनी जे. जे. मार्ग पोलीस ठाण्यात केली. श्वानदंश झालेला नसताना रेबीजची लक्षणे या निव्वळ अंदाजावर उपचार केल्याचा दावा शेख कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे.
गेल्या महिन्यात २६ मार्चच्या रात्री शेख आणि कुटुंबाने २२ महिन्यांच्या अझान याला जे.जे. रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. शेख यांनी ‘आमचे प्रतिनिधी’ आणि पोलीस ठाण्याकडे दिलेल्या जबाबानुसार, २८ मार्चला संध्याकाळी एक महिला शिकाऊ डॉक्टर अझानच्या थुंकीचा नमुना घेत असताना व्हेंटिलेटरवरील अझानच्या तोंडातून रक्तस्राव सुरू झाला. साडेतीन तासांनी तातडीने रक्ताची व्यवस्था करा, असे सांगण्यात आले. त्यानुसार रक्ताची जुळवाजुळव केली. महिला डॉक्टरने अझान पुढले जेमतेम दोन दिवस जगू शकेल, त्याची प्रकृती नाजूक आहे, असे सांगितले. ३० मार्चला मणक्यातील पाण्याचे आणि अन्य नमुने, आवश्यक ती कागदपत्रे हाती देत जे.जे.तील डॉक्टरांनी याची चाचणी बंगळूरु येथील निम्हंस रुग्णालयात करावी लागेल, असे सांगितले. तेथील चाचणीत अझानला रेबीज नसल्याचा अहवाल रुग्णालयाने दिला. रविवारी मध्यरात्री एक ते पहाटे चार यावेळेत वरिष्ठ डॉक्टरांच्या पथकाने अझानचा व्हेंटिलेटर सहा ते सात वेळा बाजूला करून नैसर्गिकरीत्या उपचार करण्याचे प्रयत्न केले. अखेर चारच्या सुमारास त्यांनी अझानचा मृत्यू ओढवल्याचे आम्हाला कळवले, असे वसीम यांनी सांगितले.