अनेक मंत्रालये हेरगिरीच्या विळख्यात

0
8

वृत्तसंस्था
नवी दिल्ली, २० फेबु्वारी
दिल्ली पोलिसांनी गुरुवारी पेट्रोलियम मंत्रालयातील कॉर्पोरेट हेरगिरी प्रकरण उघडकीस आणल्यानंतर, अर्थमंत्रालयासह इतकही काही मंत्रालये हेरगिरीच्या विळख्यात सापडली असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. दिल्ली पोलिसांनी आज शुक्रवारी दोन ऊर्जा सल्लागारांना अटक केली असून, त्यांच्याजवळून अनेक महत्त्वपूर्ण दस्तावेजांसह केंद्रीय अर्थसंकल्पातील भाषणाच्या काही प्रतीही ताब्यात घेण्यात आल्या आहेत.
पोलिसांनी गुरुवारी या प्रकरणी मंत्रालयातील दोन कर्मचार्‍यांसह पाच जणांना अटक केली होती. यानंतर शुक्रवारी आणखी दोघांना जेरबंद करण्यात आले. या सर्व सातही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर न्यायालयाने यातील चार आरोपींना पोलिस, तर अन्य तिघांना दोन आठवडे न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे. पोलिसांनी या सर्व आरोपींकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा यांना लिहिलेले पत्रही ताब्यात घेतले आहे. या हेरगिरी प्रकरणी मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयात जो एफआयआर दाखल करण्यात आला, त्यात ही धक्कादायक माहिती समाविष्ट आहे.
अर्थमंत्र्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात नॅशनल गॅस ग्रीडवरील काही बाबींचा समावेश करण्यासाठी असलेल्या दस्तावेजांच्या फोटोकॉपीही हेरांच्या ताब्यातून प्राप्त करण्यात आल्या असल्याचे एफआयआरमध्ये नमूद आहे.
हेरगिरी प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी विविध ठिकाणी धाडी घातल्या होत्या. गुरुवारी अटक करण्यात आलेल्यांमध्ये दोन दलालांचाही समावेश आहे, तर आज शुक्रवारी ज्या ऊर्जा सल्लागारांना अटक करण्यात आली, त्यांची नावे प्रयास जैन आणि प्रख्यात पत्रकार शंतनू सैकिया अशी आहेत. या दोघांकडेही पेट्रोलियम मंत्रालयातील गोपनीय कागदपत्रे मिळाली आहेत. यातील सैकिया हा माजी पत्रकार असून, पेट्रोलियम मुद्यावर त्याचे स्वत:चे वेब पोर्टल आहे. डिफेन्स कॉलनीतच त्याचे कार्यालय आहे, तर जैनची पटेल नगर भागात सल्लागार कंपनी आहे. पोलिसांनी गुरुवारी खाजगी पेट्रोलियम कंपन्यांची कार्यालये असलेल्या कॅनॉट प्लेस परिसरात धाडसत्र राबविले होते.
दरम्यान, ज्या पाच लोकांना अटक करण्यात आली होती, त्यांना मंत्रालयातील ज्या खोलीतून ही माहिती चोरीला गेली, तिथे नेण्यात आले. या खोलीच्या बनावट चाव्या तयार करून या कर्मचार्‍यांनी हेरगिरी केली होती. त्यांची कसून चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिस अधिकार्‍याने दिली. सातपैकी चार आरोपींना स्थानिक न्यायालयाने पोलिस कोठडी आणि तिघांना न्यायालयीन कोठडी ठोठावली आहे.