वीज दरवाढ सरासरी ३५ टक्के!

0
13

मुंबई : महावितरण वीज कंपनीने महसुली तूट भरून काढण्यासाठी ४ हजार ७१७ कोटी रुपयांच्या वीज दरवाढीचा प्रस्ताव ठेवला आहे. तथापि, प्रत्यक्षात हा प्रस्ताव १० हजार ६२५ कोटींचा आहे, असा दावा महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी केला आहे. त्यामुळे ही वीजग्राहकांची फसवणूक असून, नोव्हेंबर २०१४मधील दरांच्या तुलनेत वीजग्राहकांवर आता ३५ टक्के इतका दरवाढीचा बोजा लादला जाणार असल्याचा आरोपही त्यांनी केला.

औद्योगिक विजेचे दर कमी करणार आणि दाभोळची वीज नाकारणार, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या दिवशी केले त्याच दिवशी हा वीज दरवाढीचा प्रस्ताव दाखल झाल्याचे होगाडे यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, नोव्हेंबर २०१४ च्या तुलनेत विचार करता ३०० युनिटच्या आतील सर्वसामान्य घरगुती ग्राहकांवरील दरवाढ स्लॅबनिहाय १७ ते ७१ टक्के आहे. लघुदाब औद्योगिक ग्राहक आणि यंत्रमागधारकांवरील वाढ १६ ते २४ टक्के आहे. उच्चदाब औद्योगिक ग्राहकांवरील वाढ १६ ते २९ टक्के आहे. शेतकरी ग्राहकांवरील वाढ ११ ते २३ टक्के आहे आणि स्थिर आकारातील वाढीची मागणी सरसकट १५ ते २५ टक्के आहे. दोन्ही दरवाढींचा विचार करता घरगुती ग्राहकांची वीजबिले नोव्हेंबर २०१४च्या तुलनेने दीडपट तर औद्योगिक ग्राहकांची बिले किमान सव्वापट होतील. तर उर्वरित राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील वीजदर दीडपट अथवा दुप्पटच राहणार असून, अवाढव्य प्रशासकीय खर्च, वीजचोरी, अतिरिक्त वीज वितरण गळती यांची किंमत ग्राहकांना मोजावी लागत असल्याचे होगाडे यांचे म्हणणे आहे