दोन अधिका-यांसह लिपिकांना ६ दिवसांची पोलिस कोठडी

0
11

गडचिरोली, ता.२३
बहुचर्चित शिष्यवृत्ती घोटाळयात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केलेले आदिवासी विकास विभागाच्या गडचिरोली येथील प्रकल्प कार्यालयाचे तत्कालिन प्रकल्प अधिकारी दिगंबर मेंडके व विशेष समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त तुकाराम बरगे यांना आज (ता.२३) मुख्य न्याय दंडाधिका-यांनी ६ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या दोन अधिका-यांसह समाजकल्याण विभागाचा वरिष्ठ लिपिक विजय उकंडराव बागडे व आदिवासी प्रकल्प कार्यालयातील वरिष्ठ लिपिक संजय दयानंद सातपुते यांचीही रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात अनेक संस्थांनी आपापली महाविद्यालये उघडली असून, विद्याथ्र्यांची शिष्यवृत्ती हडप करण्याचा सपाटा चालविला आहे. त्यात विशेषत: व्यावसायिक अभ्यासक्रम चालविणा-या संस्थांचा समावेश आहे. या संस्था आदिवासी विकास विभाग व सामाजिक न्याय विभाग अशा दोहोंकडून शिष्यवृत्ती लाटत होत्या. काही संस्था तर बोगस पटसंख्या दाखवून, तसेच अनेक अर्जांवर एकाच विद्यार्थ्याचे छायाचित्र लावून आणि सारख्याच बँक खात्यावर शिष्यवृत्ती देउन ती हडप करीत होत्या. ही बाब लक्षात येताच गडचिरोली येथील आदिवासी विकास प्रकल्पाचे तत्कालिन प्रकल्प अधिकारी पी. शिवशंकर यांनी पोलिसांत तक्रार केल्यानंतर पोलिसांनी महिनाभरापूर्वी काही संस्थांच्या प्रमुखांवर गुन्हे दाखल केले. मात्र त्यातील काही आरोपी फरार आहेत. अशातच पोलिसांनी तपासचक्रे वेगाने फिरवून ऋषिदेव जयराम धुरके, प्रशांत सेलोकर, प्राचार्य दुर्गा वाघरे, सचिन मंदे, मनोज चिंचोळकर, वर्धा येथील नूर मोहम्मद खान, दिनेश बांगरे व चामोर्शी येथील चंद्रकात कुनघाडकर आदींना अटक केली. यातील सचिन मंदे व मनोज चिंचोळकर हे पोलिस कोठडीत, तर धुरके, सेलोकर, नूर मोहम्मद खान व कुनघाडकर हे न्यायालयीन कोठडीची हवा खात आहेत.
दरम्यान तपासअंती अनेक गैरप्रकार झाल्याचे लक्षात आल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी काल आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे तत्कालिन प्रकल्प अधिकारी दिगंबर मेंडके यास नागपुरातून, तर समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त तुकाराम बरगे यास गडचिरोलीतून अटक केली. त्यानंतर आज समाजकल्याण विभागातील वरिष्ठ लिपिक विजय बागडे व आदिवासी विकास विभागातील वरिष्ठ लिपिक संजय सातपुते यांना अटक केली. या चौघांनाही आज दुपारी गडचिरोली येथील न्यायालयात हजर करण्यात आले. मुख्य न्याय दंडाधिकारी रोहन रेहपाडे यांनी चौघांनाही २८ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. त्यांच्याबरोबरच आधी अटकेत असलेला आरोपी दिनेश बांगरे याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणात आरोपींची संख्या बारावर पोहचली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र पाटील घटनेचा तपास करीत आहेत.