आम्ही सूट विकू, उद्धव यांनी फोटो विकून समाजसेवा करावी- रावसाहेब दानवे

0
14

मुंबई- जर कोणी फोटो विकून अथवा सूट विकून समाजसेवा करीत असेल तर त्यात चूक काय? उद्धव ठाकरे यांनी फोटो विकावेत, आम्ही सूट विकून समाजसेवा करू, अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाना साधला आहे.
दोन दिवसापूर्वी उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या माध्यमातून मोदींच्या सूट लिलावावर भाष्य करीत मोदी व भाजपला लक्ष्य केले होते. दानवे यांनी उद्धव यांच्या वक्तव्याला प्रत्त्युत्तर देताना उद्धव यांच्या फोटोग्राफी प्रदर्शनावर तिरकस भाष्य करीत चिमटा काढला.
दानवे यांना पत्रकारांनी छेडले असता ते म्हणाले, मोदींनी परिधान केलेल्या सूटाच्या लिलावाकडे आम्ही नफा किंवा फायदा-तोटा म्हणून पाहत नाही. ही एक समाजसेवा आहे. उद्धव ठाकरे एक चांगले फोटोग्राफर आहेत. त्यांनी काढलेली शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांची छायाचित्रे सुंदर आहेत. ती विकून उद्धव यांनीही समाजसेवेसाठी तो पैसा वापरावा असा सल्लाही दानवे यांनी उद्धव यांना दिला.