दिल्लीचे मुख्यमंत्री मंगळवारी करणार अण्णा हजारेंसोबत धरणे आंदोलन

0
11

दिल्ली- भूसंपादन विधेयक आणि कायद्यातील सुधारणेला विरोध करण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुन्हा एल्गार पुकारला आहे. दिल्लीतील जंतर मंतरवर अण्णा हजारे यांनी धरणे अांदोलन सुरु केले आहे. या अांदोलनात आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे देखील सहभागी होणार आहेत. केजरीवाल यांनी सोमवारी सायंकाळी अण्णांची भेट घेतली. त्यावेळी ही घोषणा केल्याचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी सांगितले.

महाराष्ट्र सदनात अण्णा हजारे यांची भेट घेतल्यानंत मुख्यमंत्री केजरीवाल यांनी पत्रकारांशी संवाद साधला. केजरी‍वाल मंगळवारी (24 फेब्रुवारी) अण्णा हजारे यांच्या आंदोलनात सहभागी होणार आहे. यामुळे अण्णा हजारे यांच्या आंदोलणाला आणखी बळ मिळणार आहे.

यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी या मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा केली होती.

जंत‍र मंतरवर उपस्थित लोकांना संबोधित करताना अण्णा हजारेंनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, की निवडणुकीआधी मोदींनी जनतेला ‘अच्छे दिन आनेवाले है’ असे आश्वासन दिले होते. म्हणून जनतेने त्यांना विजयी केले. मात्र, देशाच्या परिस्थिती काहीच बदल झालेला नाही.
‘भूसंपादन कायदा शेतकर्‍यांवर अन्याय करणारा आहे. त्यामुळे हा कायदा आणणारे केंद्र सरकार आणि ब्रिटिश यांच्या काडीमात्र फरक नाही’, असे अण्णा हजारे म्हणाले. भूसंपादनाविरोधात कोर्टात न्याय मागण्याचा हक्क काढून घेणारे हे सरकार ब्रिटिशांप्रमाणे दडपशाही करत आहे.