गडचिरोलीत नक्षल्यांचा भूसुरुंग स्फोट, जवान थोडक्यात बचावले

0
13
file photo

गडचिरोली,दि.३०: शहीद सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी आज नक्षल्यांनी क्लेमोर माईनचा स्फोट घडवून पोलिसांचा घात करण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रसंगावधान राखल्याने पोलिसांना कुठलीही इजा झाली नाही. ही घटना आज सकाळी रेगडी-गरंजी मार्गावर घडली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ आणि २९ जुलै नक्षल सप्ताहाचे दोन दिवस शांततेत पार पडल्यानंतर तिसऱ्या दिवशी नक्षलवाद्यांनी घातपात घडवण्याचा प्रयत्न केला. चामोर्शी तालुक्यातील घोट-रेगडी मार्गावरील विकासपल्ली फाट्यावर नक्षल्यांनी बॅनर बांधल्याची माहिती रेगडी पोलिसांना मिळाली माहिती होती. विकासपल्ली फाट्यावर नक्षल्यांनी बॅनर बांधले होते. ही माहिती मिळताच रेगडी उपपोलिस ठाण्यातील पोलिस आज सकाळी सात वाजताच्या सुमारास विकासपल्ली फाट्याकडे पायी जायला निघाले. एक-दीड किलोमीटर अंतरावर जाताच एका नाल्याजवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या जंगलात एक इसम संशयास्पद स्थितीत दबा धरुन बसलेल्या अवस्थेत आढळला. पोलिसांनी त्याला दुरुनच हटकले. लागलीच त्या इसमाने क्लेमोर माईनचा स्फोट घडवून पळ काढला. पोलिस जवळपास शंभर-दीडशे मीटर अंतरावर असल्याने त्यांना कुठलीही इजा झाली नाही. नक्षल सप्ताहादरम्यान दुर्गम भागात चोख पोलिस बंदोबस्त असल्याने सुरुवातीच्या दोन दिवसांत नक्षलवादी बॅनर बांधण्याशिवाय काहीही करु शकले नाही. मात्र, आज फार संवेदनशिल नसलेल्या रेगडी भागात क्लेमोर माइनचा स्फोट करुन पोलिसांचा घात करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.