‘निर्भया’वरील डॉक्युमेंटरीचे संसदेत पडसाद;

0
5

नवी दिल्ली : दिल्लीतील निर्भया गँगरेपप्रकरणी बीबीसी वृत्तवाहिनीच्या एका डॉक्युमेंटरीचा वाद आता संसदेत पोहोचला आहे. बलात्कार प्रकरणातील दोषीच्या मुलाखतीमुळे गदारोळ झाल्याने सरकारने आज राज्यसभेत स्पष्टीकरण दिलं.
काही अटींवरच या मुलाखतीला परवानगी दिली होती. डॉक्युमेंटरी तयार झाल्यानंतर प्रशासना दाखवली जाणार होती. मात्र या अटींचं उल्लंघन झाल्याची कबुली केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी राज्यसभेत दिली. पण बीबीसीच्या डॉक्युमेंटरीचं प्रसारण होऊ देणार नाही. तसंच अशाप्रकारची परवानगी यानंतर कधीही देणार नाही, असंही राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केलं.

ब्रिटीश चित्रपट निर्माती लेस्ली उड्डिन यांनी निर्भया बलात्कार आणि हत्याप्रकरणी एक डॉक्युमेंटरी तयार केली आहे. या डॉक्युमेंटरीमध्ये गँगरेपमधील दोषी मुकेश सिंहचीही मुलाखत आहे. याच मुलाखतीवरुन या डॉक्युमेंटरीला जोरदार विरोध केला जात आहे.
निर्भयाने विरोध केला नसता तर तिचे प्राण वाचले असते, असं मुकेश सिंहने या मुलाखतीत म्हटलं आहे. या घटनेचा त्याला कोणताही खेद वाटत नव्हती. उलट निर्भयाच या बलात्काराला कशी जबाबदार आहे, असं त्याने सांगितलं होतं. त्यामुळे बलात्कारातील दोषीची मुलाखत घ्यायची गरजच काय असा सवालही अनेकांनी उपस्थित केला होता, त्यावर सरकारने आज राज्यसभेत स्पष्टीकरण दिलं.

जावेद अख्तर डॉक्युमेंटरीच्या बाजूने
दुसरीकडे जावेद अख्तर यांनी डॉक्युमेंटरीच्या बाजूने मत मांडलं आहे. डॉक्युमेंटरी बनवली ते चांगलंच झालं. देशातील जे लोक महिलांवर बंधनं घालतात, त्यांनाही कळेल की ते सुद्ध बलात्कारी आहे. मुलाखतीत ज्या गोष्टी सांगण्यात आल्या त्यापेक्षा जास्त घाणेरडी वक्तव्यं संसदेतही केलेली आहेत

दरम्यान, डॉक्युमेंटरीच्या वादानंतर निर्भयाच्या आईने दोषींना कठोर शिक्षा देण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला आहे.

ही डॉक्युमेंटरी 8 मार्च अर्थात जागतिक महिला दिनी प्रसारित होणार आहे. यातील मुलाखतीत आरोपीची बाजू पहिल्यांदाच समोर आली आहे. पण डॉक्युमेंटरी प्रसारित होण्याआधीच देशात मोठा वाद झाला आहे.