शिवस्मारक शुभारंभ रद्द ; मुख्य सचिवांची बोट बुडाली

0
12

मुंबई,(वृत्तसंस्था)  दि.२४ :: शिवस्मारकाच्या पायाभरणीच्या कार्यक्रमासाठी समुद्रात निघालेल्या बोटीच्या ताफ्यातील एका स्पीड बोटीला आज (बुधवार) अपघात झाला. हा अपघात आज सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास झाला. ही बोट खडकावर आदळली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर 2 हेलिकॉप्टर आणि एक बोटीच्या साहाय्याने बचावकार्य सुरु करण्यात आले. गेट वे ऑफ इंडिया पासून चार बोटी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या उद्घाटन स्थळाकडे निघाल्या. त्यांच्या मागून आणखी एक बोट आली. अशा पाच बोटी समुद्रात निघाल्या. त्यातील दोन स्पीड बोटी होत्या. एका मोठ्या बोटीवर विविध माध्यमांचे पत्रकार होते.. एका बोटीवर शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे, आमदार राज पुरोहीत आणि त्यांचे काही कार्यकर्ते होते. तर इतर बोटींवर अनेक प्रशासकीय अधिकारी, कार्यकर्ते होते.

शिवस्मारकाच्या पायाभरणीच्या कार्यक्रमासाठी बोट जात होती. त्यादरम्यान ही स्पीड बोट  गिरगावजवळील एका खडकाला धडकली. त्यानंतर ही बोट समुद्रात बुडाली. ज्या बोटीला अपघात झाला, त्यामध्ये 25 जण होते. यामध्ये राज्याच्या मुख्य सचिवांसह काही वरिष्ठ अधिकारी या बोटीत होते, अशी माहिती दिली जात आहे. पाण्यात पडल्यानंतर या सर्वांना बाहेर काढण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. बचावपथकाकडून युद्धपातळीवर काम केले जात आहे. यासाठी अग्निशमन विभागाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत. दरम्यान, ही बोट महाराष्ट्र शासनाच्या मालकीची असल्याची माहिती मिळत आहे. बोटीचा अपघात झाल्यानंतर नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

तिले लाल टेनजवळ समुद्रात अनेक मोठे दगड आहेत. त्यातच काही काळापूर्वी तिथे एक बोट बुडाली होती. त्या बुडालेल्या बोटीवरच या अधिकाऱ्यांची बोट आदळली. बोट एवढ्या जोरात आदळली, की त्यामुळे बोटीला छिद्र पडले आणि पाणी मोठ्या प्रमाणत बोटीत शिरण्यास सुरूवात झाली. हे पाहून बोटीवरील सर्वच जण धास्तावले आणि आरडा-ओरडा सुरू झाला. काही वेळातच बोट एका बाजूने पलटली. प्रसंगावधान साधून बोटीतील एका अधिकाऱ्याने किनाऱ्यावरील कोस्ट गार्डला फोन केला. त्यानंतर काही वेळातच कोस्ट गार्डकडून दोन छोट्या बोटी घटनास्थळावर पाठविण्यात आल्या. बोटीवरील सर्व अधिकाऱ्यांना सुखरूप दुसऱ्या बोटींवर घेण्यात आले. परंतु, या बोटीवर आमदार विनायक मेटे यांचा सिद्धार्थ पवार नावाचा कार्यकर्ता बेपत्ता झाला होता. रात्री साडेआठच्या सुमारास त्याचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला. पवार यांचा मृतदेह सेंट जॉर्ज हॉस्पीटल मध्ये हलविण्यात आला आहे.

बाहेर काढण्यात आलेल्या अधिकाऱ्यांपैकी एका अधिकाऱ्याची प्रकृती चिंताजनक आहे तर एका अधिकाऱ्याचा भीतीने रक्तदाब वाढला. या दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घडामोडींमुळे स्मारकाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला. आमदार विनायक मेटे, राज पुरोहीत यांच्या बोटी परत किनाऱ्यावर परत आणण्यात आल्या. आपल्या डोळ्यासमोर काही अधिकाऱ्यांची बोट बुडताना आणि त्यांचा आरडा-ओरडा पाहून पत्रकारांच्या बोटीसह इतरही बोटीमधील सर्वजण धास्तावले होते. त्यात हेलिकॉप्टरच्या घिरट्या घालण्याने आणखी भर पडली.