मुंबईनजीक बोटीला अपघात,मृताच्या कुटुंबीयांना 5 लाखाची मदत

0
8

मुंबई, दि. 24 : मुंबईनजीकच्या समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमासाठी जाणाऱ्या व्यक्तिंच्या एका बोटीला अपघात होऊन एका तरुणाचा मृत्यू झाला. या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दु:ख व्यक्त केले आहे. मृत तरुणाच्या कुटुंबीयांना राज्य शासनातर्फे 5 लाख रुपयांची मदतदेखील मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे.मुंबईनजीकच्या समुद्रात राज्य सरकारच्यावतीने उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या कामाची सुरुवात करण्यासाठी शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्यासह राज्याचे मुख्य सचिव डी. के. जैन व अन्य अधिकारी बोटीने आज दुपारी जात होते. त्यावेळी एका बोटीला अपघात झाला. यामध्ये एका तरुणाचा मृत्यू ओढवला. या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्र्यांनी दु:ख व्यक्त केले आहे. तसेच या घटनेची राज्य सरकार चौकशी करेल, असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे.

दरम्यान आज दुपारी 3.30च्या सुमारास स्मारकाच्या कामाच्या शुभारंभासाठी गेट वे ऑफ इंडिया येथून मुख्य सचिवांसह सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव मनोज सौनिक आदी अधिकाऱ्यांसह बोटींने रवाना झाले होते. बोटींमध्ये निमंत्रित पत्रकार, अधिकारी होते. दरम्यान या बोटींपैकी एक बोट बुडत असल्याची माहिती मिळाल्यानंतर मुख्य सचिवांनी तसेच समवेत असलेल्या अधिकाऱ्यांनी नियंत्रण कक्ष, कोस्ट गार्ड, नौदल व मुंबई पोलीसांना माहिती दिली. त्यामुळे तातडीने रेस्क्यू ऑपरेशन सुरु झाले.

नौदलाचे हेलिकॉप्टर्स सुद्धा तातडीने घटनास्थळी पोहचले. बुडालेल्या बोटीतील सर्वांना सुखरुपपणे बाहेर काढण्यात आले. या बोटीतील एक व्यक्ती मात्र बेपत्ता झाली होती. सर्च ऑपरेशन दरम्यान सायंकाळी 7 च्या सुमारास त्या बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह सापडला. तातडीने मदत मिळाल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेची मेरी टाईम बोर्डामार्फत चौकशी करण्यात येईल, असे मुख्य सचिवांनी सांगितले.दरम्यान मुख्य सचिव सायंकाळी साडे चारच्या सुमारास मंत्रालयात परतले. त्यांनी मंत्रालयातील आपत्कालीन कक्षात जाऊन बोट दुर्घटनेबाबत सुरु असलेल्या शोध कार्याची माहिती घेतली. यावेळी मदत व पुनर्वसन विभागाचे अपर मुख्य सचिव मेधा गाडगीळ, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव मनोज सौनिक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, वन विभागाचे सचिव विकास खारगे, माहिती व जनसंपर्क विभागाचे सचिव ब्रिजेश सिंह, मेरी टाईम बोर्डचे विक्रम कुमार आदी यावेळी उपस्थित होते. मुख्य सचिवांनी आपत्कालीन नियंत्रण कक्षातून सर्व संबंधित यंत्रणांशी संवाद साधत शोधकार्याबाबत माहिती जाणून  घेतली .