बुलढाणा जिल्ह्यातील दोन जवानांना आले वीरमरण

0
16

बुलडाणा(विशेष प्रतिनिधी)दि.15- जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात काल 42 जवान शहीद झाले आहेत. त्यात विदर्भातील बुलडाणा जिल्हयातील दोन जवानांचा समोवेश आहे. मलकापूर येथील संजय राजपूत तर लोणार तालुक्यातील नितीन शिवाजी राठोड या दोन्ही जवानांनी भारतमातेसाठी बलिदान दिले आहे.

शहीद मेजर संजय राजपूत हे मलकापुरातील माता महाकाली नगरातील रहिवाशी आहेत. सात महिन्यापूर्वी भावाचा अपघातात मृत्यू  झाला होता.आजुबाजुच्या ग्रामीण भागातून शहीद संजय राजपूत यांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी गावकरी जमले आहेत. संपूर्ण परदेशी कुटुंब हे दुःखात असून पाकिस्तानला आजन्म लक्षात राहील अशी अद्दल घडली पाहिजे, अशी भावना शहीद राजपूत यांच्या नातेवाईकांनी आणि चिलाणे गावकर्‍यांनी व्यक्त केली आहे. शहीद संजय यांच्या आई या धुळे जिल्ह्यातील चिलाणे गावच्या रहिवासी आहेत. शहीद संजय राजपूत यांचे पार्थिव मलकापुरकडे आणले जाईल, नातेवाईक मंडळी आणि गावकरी मलकापूरला जाणार आहेत.

नितीन शिवाजी राठोड हे लोणार तालुक्यातील बीबी येथून जवळच असलेल्या गोवर्धन नगर तांडा येथील रहिवासी आहे. नितीन हे केंद्रीय राखीव दलाच्या तीन बटालियनमध्ये 2006 ला आसाममध्ये भरती झाले होते. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण येथील आश्रमशाळेत झाले होते तर उच्च माध्यमिक शाळा शिक्षण दुसरबीड येथील जीवन विकास महाविद्यालयातून पूर्ण केले होते. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या नितीनला लहानपणापासूनच सैनिकी सेवेची आवड होती. त्याच्याकडे दीड एकर एवढी शेती आहे. त्याचे पश्चात पत्नी, एक मुलगा व मुलगी असून आई-वडील आणि एक लहान भाऊ असा परिवार आहे.

खेळ, व्यायाम करणे याचबरोबर या गावातील तरुणांना देशसेवेसाठी प्रवृत्त करण्याचे काम नितीन सुट्टीवर आल्यावर करायचे. ते गावकऱ्यांशी अगदी प्रेमाने वागायचे. स्वभावाने मनमिळावू असलेला नितीन सर्व गावकऱ्यांना आपल्याच कुटुंबातले वाटत होते. सुटीवर आल्यावर गावातील सर्वच लहान थोरांना आवर्जून भेटत असत. त्याच्या जाण्याने गाव व त्यांच्या कुटुंबीयांना दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हल्ला होण्याच्या चार दिवस अाधीच ते पन्नास दिवसांची सुटी घेऊन 11 फेब्रुवारीला आपल्या कर्तव्यावर रुजू झाले होते. संपूर्ण गोवर्धन नगरात कालपासून संत सेवालाल महाराज जयंती उत्सवाची जय्यत तयारी करीत होते. त्यातच हे दुखद वृत्त येऊन धडकल्याने संपूर्ण गावाच्या आनंदावर विरजण पडले आहे.