राज्यपालांच्या अभिभाषणावर विरोधकांचा बहिष्कार

0
16

मुंबई(विशेष प्रतिनिधी)दि.25 – राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राज्यपालांच्या अभिभाषणाने सुरुवात झाली आहे. सहा दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात विरोधकांनी विविध कारणांवरून राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार घातला. तत्पूर्वी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावर सुद्धा विरोधकांनी बहिष्कार टाकला. सोबतच, विधीमंडळाच्या या अधिवेशनात अनेक मुद्द्यांवर सरकारला घेरण्याची तयारी सुद्धा केली आहे. यात शेतकऱ्यांची कर्जमाफी, दुष्काळ, नोकरभरती, मुंबईचा विकास आराखडा आणि भ्रष्टाचार इत्यादींमुळे अधिवेशन वादळी ठरणार अशी चिन्हे आहेत.

विरोधकांनी चहापानावर बहिष्कार घातला त्यानंतर मुख्यमंत्री पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांची खरडपट्टी काढली. चहापान काही सेलिब्रेशन नाही तर सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्रित येऊन चर्चा करण्याचे व्यासपीठ आहे. राज्य विधीमंडळाच्या या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पूर्ण अर्थसंकल्प मांडला जाणार नाही. यात 27 फेब्रुवारीला केवळ लेखानुदान सादर होईल. तसेच 28 फेब्रुवारीला त्यावर चर्चा होणार आहे. लेखानुदानात नवीन योजनांचा समावेश नसतो तर प्रामुख्याने एप्रिल आणि मे या दोन महिन्यांच्या आवश्यक खर्चांची तरतूद केली जात असते. पूर्ण अर्थसंकल्प जूनच्या अधिवेशनात सादर केला जाणार आहे.