गृहराज्यमंत्री रणजित पाटलांची एसीबी चौकशी सुरु

0
6

मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडील महत्त्वाच्या खात्यांचे राज्यमंत्रीपद सांभाळणारे, मुख्यमंत्र्यांचे निकटवर्ती अशी प्रतिमा असलेले राज्याचे गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या मालमत्तेबाबत गुप्त चौकशी सुरू असल्याच्या बातम्या येताच विधीमंडळात त्याचे पडसाद उमटले. फडणवीस यांचे सरकार पारदर्शक असल्याचा आव भाजपवाले करीत आहेत. मात्र, खुद्द सरकारमधील जबाबदार मंत्र्याच्या मालमत्तेची चौकशी सुरू असेल तर गृहराज्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांनी विधानसभेत केली.मुख्यमंत्र्यांचे निकटवर्ती व राज्याचे गृहराज्यमंत्री (शहर) रणजित पाटील यांनी मालमत्तेबाबत चुकीची माहिती दिल्याची तक्रार आल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने त्यांच्या मालमत्तेबाबत गुप्त चौकशी सुरू करण्यात आल्याची बातमी एका दैनिकाने दिल्यानंतर त्याचे अधिवेशनात पडसाद उमटले. मूळचे अकोल्याचे असलेले डॉ. रणजित पाटील हे अमरावती पदवीधर मतदारसंघातून भाजपचे आमदार म्हणून विधान परिषदेवर निवडून आले आहेत. राज्यात भाजपचे सरकार येताच पाटील यांच्याकडे गृहराज्यमंत्रीपद (शहरे) देण्यात आले आहे. याशिवाय त्यांच्याकडे सामान्य प्रशासन विभाग, नगरविकास, विधी व न्याय, विधिमंडळ कामकाज या महत्त्वाच्या खातीही देण्यात आली आहेत. वरील सर्व कॅबिनेट खाती मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहेत. यावरून त्यांची फडणवीसांसोबत असलेली जवळीक लक्षात येते.