अमरावती जिल्ह्यातील उमरखेड येथे संत्रा गुणवत्ता उपकेंद्र सुरु करणार- एकनाथराव खडसे

0
13

मुंबई : अमरावती जिल्ह्यातील उमरखेड येथे संत्रा गुणवत्ता केंद्राचे उपकेंद्र सुरु करण्यात येईल. त्यासाठी एक कोटी 25 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्याचे संत्रा धोरण तयार करण्यासाठी कार्यवाही सुरु असल्याची माहिती फलोत्पादन मंत्री एकनाथराव खडसे यांनी गुरूवारी विधानसभेत दिली.
सदस्य डॉ. अनिल बोंडे यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना श्री. खडसे बोलत होते. ते म्हणाले, नागपूर येथे संत्रा गुणवत्ता केंद्र उभारण्यात आले आहे. ते अपग्रेड करुन या केंद्राचे उपक्रेंद उमरखेड येथे सुरु करण्यात येईल.संत्र्याचा प्रसार, प्रचार व त्याची दर्जेदार निर्मिती होऊन आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विक्री व्हावी यासाठी राज्य शासनातर्फे प्रयत्न केले जात आहेत. ‘आरोग्याचा महामंत्र- रोज खा एक संत्रं’ या घोषवाक्यानुसार संत्र्याविषयी माहिती पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्यात संत्रा धोरण तयार करण्याचे काम सुरु आहे. संत्रा उत्पादक भागातील शेतकरी, स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा करुन सर्वसमावेशक धोरण तयार करण्यात येईल, असेही श्री. खडसे यांनी सांगितले.
यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी भाग घेतला.