कर्जबुडव्यांची कुंडली बँकांना मिळणार एकाच ठिकाणी

0
9

मुंबई, – कर्जबुडव्यांना चाप लावण्यासाठी आता रिझर्व्ह बँकेनेच कंबर कसली आहे. देशातील बँकांना कर्जबुडव्यांची सहज आणि तत्काळ माहिती उपलब्ध व्हावी म्हणून रिझर्व्ह बँक कर्जदारांची इत्थंभूत माहिती असलेले नोंदणीकृत कार्यालय देशपातळीवर सुरू करणार आहे. त्यामुळे बँकांना कर्जबुडव्यांची कुंडली सहज मिळू शकणार आहे. बँकांचे कर्ज बुडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर बुडीत कर्जदारांची माहिती असलेले केंद्रीय कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. त्याबाबतचा आराखडा अंतिम करण्याचे काम सुरू असल्याची माहिती रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर एस. एस. मुंदडा यांनी दिली. सध्या कर्जबुडव्यांची माहिती संबंधित बँकेच्या संकेतस्थळावर असते. त्यामुळे प्रत्येक कर्ज देताना प्रत्येक बँकेची वेबसाइट बघणे शक्य नसते. याचा फायदा कर्जबुडवे उठवत आहेत. त्याला आळा घालण्यासाठी ही नवीन यंत्रणा उभारण्यात येणार आहे.