रेल्वेत चोरट्यांनी चक्क आमदारांंचेच साहित्य लुटले

0
18

मुंबई(विशेष प्रतिनिधी)दि.25 – पावसाळी अधिवेशन मुंबईत सुरु असल्याने बुलडाणा जिल्ह्यातील चिखली मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार राहुल बोंद्रे, शिवसेनेचे आमदार संजय रायमूलकर आणि शिवसेनेचे आमदार शशिकांत खेडेकर हे आज सकाळी मुंबईला रेल्वेन पोहचले. आमदार बोन्द्रे हे सोमवारी मलकापूर येथुन विदर्भ एक्स्प्रेसमध्ये मुंबईला जाण्यासाठी बसले होते. सोबत त्यांच्या पत्नी वृषाली बोंद्रे देखील होत्या. तर आमदार रायमूलकर आणि आमदार खेडेकर हे जालना वरून देवगिरी एक्स्प्रेसने मुंबईला पोहचले.आमदार बोंद्रे मंगळवारी सकाळी कल्याण स्टेशनला उतरणार त्याचवेळी चोरट्याने बोगीत घुसून त्यांच्या पत्नी वृषाली यांच्या जवळील पर्स हिसकावून धूम ठोकली आणि आमदार बोंद्रे यांच्या महत्त्वाच्या कागदपत्रांची फाईलही पळवली. पर्समध्ये २६ हजार, एटीएम कार्डसह अन्य साहित्य होते. दुसरीकडे, जालनावरुन देवगिरीने येणारे आमदार रायमूलकर हेही कल्याण स्टेशनला उतरणार असल्याने सकाळी उठले. मात्र, त्यावेळी त्यांचा मोबाईल आणि खिशातील १०हजार रुपये चोरट्याने चोरल्याचे त्यांच्या लक्षात आले. तसेच बॅगला ब्लेडने कापल्याचेही समोर आले.विशेष म्हणजे दोन्ही आमदार प्रवास करत असलेली बोगी ही अधिवेशन सुरु असल्याने आमदारांसाठी राखीव असते. त्यामुळे आमदारांसाठी राखीव असलेल्या बोगीत चोर कसे काय आले असा प्रश्न आमदारांनी उपस्थित केला आहे.मात्र, आमदारांना आलेला अनुभूव नवीन असला, तरीही सामान्य रेल्वे प्रवाश्यांना हा रोजचा अनुभव आहे.