शेती, वनजमिनीवर मॉईलचे ‘डम्पिंग यार्ड’

0
18

तुमसर : मॉईल प्रशासन अवैध मॅग्नीज डम्पींग आदिवासींच्या शेतजमिनीवर करीत आहे. डोंगरी बु. मॅग्नीज खाणीतून मागील अनेक वर्षापासून मॅग्नीज काढणे सुरु आहे. आदिवासी तथा वनविभागाच्या जमिनीवर मॉईल प्रशासनाने नियमबाह्य डम्पींग यार्ड तयार केले आहे. पर्यावरण नियमांना मुठमाती देण्यात आली आहे. दरवर्षी डम्पींग क्षेत्र वाढत आहे.
बाळापूर साझा डोंगरी बु. येथील आदिवासी शेतकरी तुकाराम उईके सर्व्हे क्रमांक ६५/२, धर्मराज तुकाराम उईके सर्व्हे क्रमांक ६७ दोघांची आराजी १.५२ हे.आर. मध्ये विना परवानगीने तथा मोबदला न देता बळजबरीने शेतात डम्पींग करणे सुरु आहे. शेतमालकांनी मॉईल प्रशासनाला याची तक्रार केली. परंतु तक्रारीला केराची टोपली दाखविण्यात आली. सध्या या शेतकर्‍यांवर उपासमारीचे संकट ओढावले आहे.
बाळापूर गट क्रमांक १0९ मध्ये वनविभागाच्या जमिनीवर १४ हेक्टर आर.मध्ये एच.आय.एम.एस. प्लांट (मॅग्नीज सार्टींग) तयार केला आहे. यात अवैध डम्प तयार केला.संबंधित विभागाची येथे अनुमती घेतली नाही. यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. या डम्पमुळे कुंभरे यांच्या शेतात पाणी येत आहे.ज्यामुळे पिकांना धोका निर्माण झाले आहे. तक्रार केल्यावर केवळ मॉईल प्रशासन होकाराचे गाजर दाखविते. या प्रकरणाची चौकशी करावी याकरिता शेतकर्‍यांचे प्रतिनिधीमंडळ केंद्रीय सतर्कता विभाग तथा डी.जी.एफ. (निर्माण भवन), दिल्ली येथे जाणार आहे.
डोंगरी बु. येथील शेतकरी नानाजी राहांगडाले, मंगरू राहांगडाले, उर्मिला रामचंद्र पटले यांच्या शेतातील मागील २५ वर्षापासून मॉईल प्रशासन मॅग्नीजचे उत्खनन करीत आहे. याकरिता मॅग्नीजचे वरिष्ठ अधिकारी जबाबदार आहेत. डोंगरी बु. येथील गट क्रमांक १८७मध्ये १.७५ एका शेतीत शेतकरी आपली उपजिविका करीत होते. सध्या त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.जिल्ह्याचे खासदार व आमदार यांना मॉईल प्रशासन खोटी माहिती देवून दिशाभूल करतात. या सर्व प्रकरणाची माहिती केंद्रीय सतर्कता विभागाला देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य अशोक उईके यांनी दिली. मॉईल प्रकरणाची चौकशी केली तर मोठे घबाड बाहेर येण्याची शक्यता वर्तविण्यात येते. डोंगरी बु. व चिखला येथे मॉईलच्या खाणी आहेत. या खाणीचे क्षेत्र कुठून कुठपर्यंत आहे याची माहिती वनविभाग तथा महसूल प्रशासनालाही नाही. डोंगरी बु. कुरपुडा रस्त्याच्या शेजारी मॉईल वेस्टेज मटेरियलचे उंच ढिगारे तयार झाले आहेत. कुरमुडा गावातील नागरिकांना बाराही महिने सर्दी खोकल्याचा त्रास आहे. परिसरातील गावातील नागरिकांना श्‍वसनाचा त्रास आहे. पिण्याचे पाणी आरोग्यास अपायकारक झाले आहे. हजारो नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहचला आहे. दरवर्षी केंद्र शासनाच्या भूगर्भ विभाग, पर्यावरण तथा आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांच्या पथकाने येथे भेट देण्याचा नियम आहे. येथे केवळ कागदावर भेट दिली जाते. वनविभागाच्या अधिकार्‍यांच्या पथकाने येथे भेट देण्याचा नियम आहे. येथे केवळ कागदावर भेट दिली जाते. वनविभागाच्या जमिनीवर मॉईलने अतिक्रमण केले तरी संबंधित विभाग मूळ गिळून गप्प आहेत.